"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 01:32 PM2024-11-24T13:32:33+5:302024-11-24T13:33:00+5:30
महायुतीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मराठी कलाकारांनी अभिनंदन केलंय
काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या वेळी भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीने चांगलीच मुसंडी मारली. तब्बल २३० जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करुन महायुतीच्या निकालाबद्दल आनंद साजरा केलाय. 'धर्मवीर २'चे निर्माते-अभिनेते मंगेश देसाई आणि अभिनेता सुशांत शेलार यांनी खास पोस्ट शेअर करुन शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या महायुतीचं अभिनंदन केलंय.
मराठी कलाकारांनी केलं महायुतीचं अभिनंदन
'धर्मवीर' आणि 'धर्मवीर २'चे निर्माते-अभिनेते मंगेश देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट करुन लिहिलंय की, "त्या सगळ्या माझ्या कलाकार मित्रांचे आभार ,ज्यांनी साहेबांवर विश्वास ठेऊन मनात शंका न आणता, माझ्या बरोबरचं मैत्रीचं नातं जपून शिवसेनेच्या प्रचारात सहभाग घेतला. धन्यवाद मित्रांनो."
तर अभिनेता सुशांत शेलारने पोस्ट करुन लिहिलंय की, ""शिवसेना महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळेच ही विजयाची गाथा लेखली गेली आहे. जनतेच्या विश्वासाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. हा विजय महायुतीच्या एकात्मतेचे प्रतीक आहे."
वानखेडेवर होणार शपथविधी सोहळा?
महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित हाेण्याची शक्यता आहे.