मराठी टायगर्सची शिनोळीसह महाराष्ट्रात डरकाळी
By Admin | Published: February 7, 2016 04:27 AM2016-02-07T04:27:26+5:302016-02-07T04:27:26+5:30
सीमावासीय मराठी जनतेच्या भावना मांडणाऱ्या ‘मराठी टायगर्स’ची डरकाळी आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सीमा भागातही फुटली. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे सीमाभागातील
सीमावासीय मराठी जनतेच्या भावना मांडणाऱ्या ‘मराठी टायगर्स’ची डरकाळी आज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सीमा भागातही फुटली. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे सीमाभागातील ‘शिनोळी’ येथे दणक्यात स्वागत झाले.
बेळगावमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र हद्दीत १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘शिनोळी’ येथे खास टूरिंग टॉकीज उभारण्यात आले होते. अमोल कोल्हे ‘लोकमत सीएनक्स’ला म्हणाला, ‘‘आम्ही शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत. मराठी टायगर्स कोणालाही घाबरत नाही, चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणून मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी करता कामा नये. म्हणून कोणालाही न घाबरता हा चित्रपट आम्ही बेळगाव व महाराष्ट्राच्या सीमेवरील ‘शिनोळी’ या गावात दाखविलाच. वातानुकूलित तंबूत १३ बाय २५ च्या स्क्र ीनवर एकावेळी ५०० जणांना हा चित्रपट पाहता आला. सीमावासीयांसाठी चित्रपटाचे दररोज चार खेळ होणार आहेत. सकाळी १०, दुपारी १, दुपारी ४ आणि सायंकाळी ७ असे या खेळांचे वेळापत्रक आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवर शो झालाच पाहिजेचा गजर करीत सीमावासीयांनी या चित्रपटाचे आणि अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह संपूर्ण टीमचे जोरदार स्वागत केले. कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून चित्रपटाच्या पहिल्या शोचा नारळ फुटला.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा आणि कर्नाटकी प्रशासनाच्या दुराग्रहामुळे सीमाभागात नाकारला गेलेला आपला हक्काचा चित्रपट शिनोळीत तंबूत पाहायला मिळणार, या आशेने असंख्य नागरिक दाखल झाले होते. सकाळपासूनच पहिल्या शोसाठी गर्दी झाली होती. सकाळी ११ नंतर सीमाभागातून दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या शिनोळीत वाढू लागली होती. याचवेळी महाराष्ट्र शिवसेनेचे पदाधिकारीही दाखल होऊ लागले होते. गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे मराठी टायगर्सचा प्रीमियर झाल्यानंतर लगेचच प्रवासास सुरुवात केलेल्या अभिनेते तसेच शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास शिनोळीच्या सीमारेषेवर आगमन झाले. ढोल, ताशे आणि डॉल्बीच्या तालावर शिवसेना गीत वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटनाच्या दिनी झालेली गर्दी चित्रपटाच्या तंबूत सामावणे अवघड होते. मात्र, अतिशय दाटीवाटीने तंबूमध्ये जागा मिळवून सीमाभागाच्या इतिहासातील या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत होता. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर तर नागरिकांचा ऊर भरून आला. कलाकारांचे कौतुक करण्यात आले.