महाराष्ट्रात जन्माला आली 'हिरोची वाडी', या गावातील लोक गेल्या 10 वर्षांपासून पाहतात इरफान खानचे सिनेमे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 01:22 PM2020-05-13T13:22:57+5:302020-05-13T13:23:29+5:30
या गावात आजूबाजूच्या परिसरात एकही सिनेमागृह नाही आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून इरफानचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी हे गावकरी 30 किमी दूर जातात.
अभिनेता इरफान खानने 29 एप्रिलला अचानक जगाचा निरोप घेतला. मात्र आजही त्याच्या आठवणी लोकांच्या मनात घर करून कायम आहेत आणि ते व्यक्ती आपल्या पद्धतीने त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. मात्र इरफानच्या निधनानंतर महाराष्ट्रात हिरोची वाडी जन्माला आली आहे. या गावाशी इरफानचे खास कनेक्शन आहे.
इरफान खानच्या निधनानंतर महाराष्ट्रातील एका गावाने चक्क आपल्या गावाचे नावच बदलले आहे. आता या गावाचे नाव खास इरफानच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. नाशिक जिल्यातील इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी गावाने आपल्या गावाचे नामकरण केले आहे. या गावाचे नाव 'हिरोची वाडी' असे ठेवले आहे.
या गावात आजूबाजूच्या परिसरात एकही सिनेमागृह नाही, मात्र गेल्या 10 वर्षांपासून इरफानचा प्रत्येक चित्रपट हे गावकरी पाहत आहेत. गावकरी खास इरफान खानचा चित्रपट पाहण्यासाठी 30 किमी दूर नाशिकला जातात. आता गावकऱ्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागाचे नाव बदलून 'हिरोची वाडी' असे केले आहे. इरफानने या गावाच्या विकासासाठी खूप मदत केली आहे.
10 वर्षांपूर्वी तो प्रथमच इगतपुरीला आला होता त्यावेळी त्याने इथे घर विकत घेतले होते. आता हे घर काही आदिवासींसाठी त्यांचे राहण्याचे ठिकाण बनले आहे.
इरफानने गावकऱ्यांना रुग्णवाहिका मिळवून दिली. तिथल्या शाळेसाठी देखील मदत केली आणि मुलांना पुस्तके दिली.
इतकेच नाही तर इरफानवर अमेरिकेत कर्करोगाचा उपचार सुरू असतानाही त्याने इथल्या मुलांना मदत पाठवली होती. इरफानच्या या कार्यामुळे गावाने त्याच्या निधनानंतर गावाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला.