"इंडियन आयडॉलचा विनर ते बिग बॉस ", पृथ्वीक प्रतापची अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट; म्हणतो, 'सूरज जिंकला तेव्हा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:12 AM2024-10-16T10:12:35+5:302024-10-16T10:15:31+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट केली आहे.

maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap special post for abhijeet sawant viral on social media | "इंडियन आयडॉलचा विनर ते बिग बॉस ", पृथ्वीक प्रतापची अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट; म्हणतो, 'सूरज जिंकला तेव्हा...'

"इंडियन आयडॉलचा विनर ते बिग बॉस ", पृथ्वीक प्रतापची अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट; म्हणतो, 'सूरज जिंकला तेव्हा...'

Prithvik Pratap : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या या शोने कित्येक नवोदितांनाही त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली आहे. हास्यजत्रेतूनच अभिनेता पृथ्विक प्रताप(Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या पृथ्विकला हास्यजत्रेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. पृथ्विकचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. अलिकडेच पृथ्वीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठी फेम अभिजीत सावंतसाठी(ABhijeet Sawant) भलीमोठी पोस्ट केली आहे. 'फुलवंती' चित्रपटाच्या प्रिमियर दरम्यान अभिजीतची आणि पृथ्वीकची भेट झाली. त्यादरम्यान फेसबुक पोस्टद्वारे अभिनेत्याने अभिजीतचं भरभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. 


अभिनेता पृथ्वीक प्रतापने या पोस्टमध्ये लिहलंय, "मी सातवी- आठवीत असताना दिवाळीच्या दरम्यान माझ्या मामा ने घरी एक MTNL landline फोन बसवून घेतलेला. ज्यावर फोन आलेला नसताना सुद्धा ‘हॅलो’ म्हणायला भारी वाटायचं. कित्येकदा तर आम्ही स्वतःच त्याची रिंग वाजवायचो जी माळ्यावरच्या आठही खोल्यांना ऐकू जायची आणि मग सगळ्यांना कळलं फोन आलाय की हॅलो म्हणायचो, खरंतर तेव्हा outgoing calls ना खूप पैसे लागायचे आणि incoming calls ना सुद्धा त्यामुळे त्या फोनचं आम्ही फक्त खेळणं करून टाकलेलं. थोडक्यात काय तर काही काळापर्यंत ‘शायनिंग’ मारण्यापलिकडे त्या फोन चा वापर मी तरी कधी केला नव्हता".

"हळू हळू वार्षिक परिक्षा ही जवळ आलेली त्यामुळे फोन सोबत खेळत बसणं, TV बघणं हे सगळं कमी झालेल. केबल काढून TV तर बंदच होणार होता पण तरीही त्यातल्या त्यात, मामी, आज्जी आणि आई ‘वादळवाट, अवंतिका, वगैरे’ मालिका आवडीने पहायच्या म्हणून केबल चालू राहिला. पण अचानक आमच्या मामाने या लिस्टमध्ये अजून एक कार्यक्रम add केला ज्याचं नाव होतं ‘INDIAN IDOL’".

पुढे अभिनेत्याने लिहलंय, ‘अरे आपला एक मराठी पोरगा आहे “अभिजीत सावंत”या एका feeling साठी आम्ही कार्यक्रम पहायला सुरुवात केली आणि TV पाहण्याची वेळ थोडी आणखी वाढली. मग काय सगळेच या कार्यक्रमासोबत अभिजीत सावंतच्या गोड स्माईलच्या आणि गोड आवाजाच्या प्रेमातच पडलो. सांगायचा मुद्दा हा की INDIAN IDOL च्या फिनालेचा विजेता अभिजीत सावंतच व्हावा या साठी जमतील तेवढे प्रयत्न केले होते आम्ही. शाळेत, बिल्डिंग मध्ये जिथे जाईन तिथे अभिजीत सावंतच जिंकला पाहिजे अशी ‘मौखिक प्रसिद्धी’ सतत केली. पण फक्त तेवढं करुन चालणार नव्हतं कारणं तो जिंकणार की नाही हे वोट्सवर ठरणार होतं म्हणून इतक्या दिवसात फोन वर खेळणं थांबवलेलं ते पुन्हा सुरु केलं".

"INDIAN IDOL चा अभिजीत सावंत चा voting number गणिताच्या वहीच्या मागच्या पानावर लिहून घेतला होता. अर्थात तो आधी पाठ केला होता. १९०० २४२४ २५२५ ०२. हा ‘02’ फार महत्त्वाचा होता कारण तो चुकला तर आपलं वोट ‘अमित साना’ ला वगैरे जाऊ शकतं अशी सतत भिती होती. घरातल्यांसमोर हा फोन लावू शकत नव्हतो कारण त्याचे साधारण प्रति फोन ३ रुपये वगैरे लागणार होते. म्हणून रात्री अपरात्री सगळे झोपल्याची खात्री करून मगच अभिजीत सावंत ला वोट केलंय. तो जिंकावा यासाठी खूप प्रार्थना वगैरे सुद्धा केल्यात. ज्यादिवशी तो जिंकला त्यादिवशी आमच्या बिल्डिंग मध्ये फटाके सुद्धा फोडलेले काहींनी. कारण फिलिंगच बाप होतं ना. ‘मराठी माणूस जिंकल्याचं’. अभिजीत जिंकला होता तेव्हा चेहऱ्यावर तेच स्मित हास्य. रनर अप अमित सानाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सुद्धा गायला सांगितलं होतं त्याने. तेव्हाचं कळलं होतं माणूस म्हणून पण भारी आहे हा!"

"पुढच्या महिन्यात आलेलं फोनचं बिलं पाहून मामा गांगरला होता. त्यानंतर तो फोन बंदच ठेवण्यात आला. पुढे मामाने सॅमसंगचा मोबाईल घेतला आणि त्याचे महत्त्वाचे फोन उचलायला सुरुवात केली. पण अभिजीत सावंत जिंकला होता. 

तब्बल २० वर्षांनी त्याला आणखी एका रिएलीटी शो मध्ये बघून खूप बरं वाटलं. पण यावेळी दोन्ही फायनलिस्ट खूपचं आवडते होते. सूरज जिंकला तेव्हा मन भरून आलं. गरिबाचं पोरं प्रस्थापितांच्या दुनियेत काहीतरी जादू करू पाहतय हे दिसलं. अभिजीत सावंत रनर अप ठरला पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या मायेने तो सूरजसोबत वागत होता, ते बघून त्याच्याविषयी आदर आणखी वाढला. तेव्हा एकदातरी भेटलं पाहिजे या माणसाला असं वाटलं.आणि परवा फुलवंतीच्या प्रिमियर ला आमची भेट झाली. मी थोडा excite झालो होतो. मी जाऊन अभिजीत सावंत ला भेटलो त्याला म्हणालो, ‘hi, अभिजीत दादा खूप आवडतोस तू मला. Big Fan’ त्यावर एक सेकंद ही न लावता तो म्हणाला ‘अरे सेम टू यू. मी हास्यजत्रा पाहतो फार आवडीने. infact मी तुला झी मराठीवरच्या ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेपासून बघतोय. माझी फॅमिली तुझं काम enjoy करते.

हे ऐकून मी सरप्राईज झालो. काय बोलू कळेना. त्याने मात्र खांद्यावर हात ठेवून गप्पा मारल्या फार प्रेमाने गळाभेट केली..बाजूलाच गोस्वामी सर उभे होते त्यांना सुद्धा आवर्जून भेटला. कार्यक्रम आवडतो हे सांगितलं आणि हसत हसत आणखीन एक आनंद देऊन त्याच्या गोड स्माईल ने इतरांना भेटू लागला. ही पोस्ट माझ्या त्या आवडत्या माणसाच्या कौतुकासाठी". असं अभिनेता म्हणाला.

Web Title: maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap special post for abhijeet sawant viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.