Prasad Khandekar : तर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर IPL गाजवत असता, पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:58 AM2023-05-05T11:58:44+5:302023-05-05T12:48:37+5:30
प्रसादची निवड अंडर १४साठी मुंबईतून झाली होती. त्याच्या आयुष्यात जर ती घटना घडली नसती तर आज तो क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसला असता.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या शोमधील विनोदवीरांची चर्चा नेहमीच होत असते. या कार्यक्रमातील असाच एक विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे. हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या प्रसाद खांडेकरला कधीच अभिनयात रस नव्हता. खरं तर त्याला क्रिकेटर व्हायचं होतं. पण एक 'ती' घटना घडली नसली तर तो 'हास्यजत्रा' नाही तर 'IPL' गाजवत असता. आज त्याच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया त्याचा अभिनयातील प्रवास...
प्रसादचं 'कुर्रर्रर' हे विनोदी नाटक सध्या जोरदार सुरू आहे. चाहत्यांचा आवडता प्रसाद हा उत्तम क्रिकेटर आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे. त्याच्या आयुष्यात जर ती घटना घडली नसती तर आज तो क्रिकेटचं मैदान गाजवताना दिसला असता. अंडर १४साठी त्याची मुंबईतून निवड देखील झाली होती.
कलाक्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात कशी काय झाली यबाबत प्रसादने एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रसाद म्हणाला होता, मी खरं तर क्रिकेटपटू होतो. अंडर १४साठी माझी मुंबईमधून निवड झाली होती. दहावीनंतर माझा अपघात झाला होता. यानंतर जवळपास तीन महिने माझ्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांसोबत ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे भरत जाधवचं नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला ते क्रिकेट सारखंच वाटलं कराण तुम्हाला समोरासमोर कामाची पोचपावती मिळते”.
माझ्या कुटुंबातून कोणीच याक्षेत्रात नाही पण बाबांना नाटकाची आवड होती. हळूहळू मलाही या क्षेत्राबाबत आवड निर्माण झाली. मी कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयामधून शिक्षण घेत होतो. त्यावेळी महाविद्यालयामध्ये एकांकीका हा प्रकार नव्हता. त्यात ठाकूर महाविद्यालयामध्ये फार कमी मराठी मुलं होती. मग मीच १० ते १५ मुलं जमा केली. आम्ही मराठी कलामंच नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुप अंतर्गत मी एकांकीका करू लागलो. इथूनच माझ्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. ‘आम्ही पाचपुते’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं”.