ओंकारने गायलं 'अगं अगं आई...', नम्रताच्या डोळ्यात पाणी; 'तू..दूर का' गाण्याने पुन्हा जिंकलं मन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 08:35 AM2023-10-08T08:35:25+5:302023-10-08T08:36:09+5:30
हास्यत्रेतीलच 'अगं अगं आई..' हे गाणं ओंकारने म्हटलं आणि नम्रता रडायलाच लागली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून लोकप्रिय झालेले कलाकार नम्रता संभेराव (Namrata Sambherao), ओंकार भोजने (Onkar Bhojane) आणि वनिता खरात जेव्हा एकत्र मंचावर येतात तेव्हा प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होणार हे नक्की. पण नुकतंच हे तिघेही एका कार्यक्रमात आले असता ओंकारने सादर केलेल्या एका गाण्यामुळे नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती खूपच भावूक झाली. हास्यत्रेतीलच 'अगं अगं आई..' हे गाणं ओंकारने म्हटलं आणि नम्रता रडायलाच लागली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'एकदा येऊन तर बघा' हा मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. यामध्ये ओंकार भोजनेसह नम्रता संभेराव, वनिता खरात आणि रोहित मानेही झळकणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशननिमित्त आयोजित कार्यक्रमात हे तिघेही स्टेजवर आले. ओंकारने 'अगं अगं आई..' हे गाणं सादर केलं. नम्रतासाठी हे गाणं हास्यजत्रेपासूनच खूप खास आहे असं ती म्हणाली. अनेक वर्षांनी ओंकारकडून तिने हे गाणं ऐकलं. हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले होते. तेव्हा ओंकार लगेच तिच्या हातातून माईक घेत म्हणाला,'आणखी एक गाणं तुझ्यासाठीच म्हणतो. ते गाणं फक्त प्रेयसीसाठी असून शकत नाही. कारण मी तुझ्यापासून खूप दूर राहतो. म्हणूनच तू...दूर का.... हे गाणं तुम्हाला सगळ्यांना कितीही कंटाळा आला असला तरी म्हणतो.'
'तू..दूर..का' हे ओंकारने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सादर केलेलं गाणं आजही खूप लोकप्रिय आहे. ओंकार जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याला हे गाणं ऐकवण्याची विनंती केली जाते. या कार्यक्रमात ओंकारने खास नम्रतासाठी हे गाणं म्हटलं आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली.
ओंकार भोजनेने जेव्हापासून हास्यजत्रा सोडली तेव्हापासून प्रेक्षक निराश झाले. आजही ओंकारला परत आणा असा प्रेक्षकांचा सूर ऐकू येत असतो. ओंकारचं टीमसोबत काही बिनसलं का अशाही चर्चा झाल्या. वनिता खरातच्या लग्नात ओंकार आला नाही तेव्हा तर अगदी शिक्कामोर्तब झाल्यासारखं होतं. मात्र नंतर ओंकारने नवीन संधी आल्यामुळे हास्यजत्रा सोडली असं स्पष्ट केलं. तरी आजही चाहते ओंकारची सतत आठवण काढत असतात.