Mahesh Bhatt : ओशोंनी मला बर्बाद करण्याची धमकी दिली होती, विनोद खन्नांना...., महेश भट यांचा शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:15 AM2023-03-12T11:15:39+5:302023-03-12T11:17:47+5:30
Mahesh Bhatt : एकेकाळी ओशो या नावानं अख्ख जग भारावलं होतं. सुप्रसिध्द अभिनेता विनोद खन्ना तर सगळं काही सोडून ओशोंना शरण गेला होता. दिग्दर्शक महेश भट यांच्यावरही ओशोंचा मोठा प्रभाव होता.
संभोग से समाधी की ओर नावानं भाषणं देत पुस्तक लिहिणाऱ्या आणि आयुष्याविषयी, जीवनशैलीविषयी खूप वेगळ्या कल्पना मांडणाऱ्या आचार्य रजनीश (Rajneesh) उर्फ ओशो (Osho) यांचा भारतातच नाही, तर जगभरात मोठा शिष्य समुदाय होता. आजही त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे हजारो अनुयायी जगभर पसरलेले आहेत. एकेकाळी ओशो या नावानं अख्ख जग भारावलं होतं. सुप्रसिध्द अभिनेता विनोद खन्ना तर सगळं काही सोडून ओशोंना शरण गेला होता. दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhatt ) यांच्यावरही ओशोंचा मोठा प्रभाव होता. विनोद खन्ना व ओशोंची भेट घडवण्यामागे महेश भट यांची मोठी भूमिका होती. पण अचानक असं काही घडलं की, ओशोंनी महेश भट यांनी बर्बाद करण्याची धमकी दिली होती. होय, खुद्द महेश भट यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.
अरबाज खानच्या The Invincibles या शोमध्ये महेश भट यांनी ओशोंबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
काय म्हणाले महेश भट?
मी माझ्या करिअरच्या सुरूवातीला एका मार्गदर्शकाच्या शोधात होतो. याचदरम्यान मी स्वयंभू गुरू ओशो रजनीश यांना भेटलो. मी त्यांच्या जणू प्रेमात पडलो होतो. त्यांना शरण गेलो होतो. पण काही काळानंतर हे सगळं योग्य नाही, हे मला जाणवू लागलं. त्याचकाळात ओशोंनी मला उद्धवस्त करण्याची धमकी दिली होती, असं महेश भट म्हणाले.
मी एक सामान्य मुलगा होतो...
मी एक सामान्य मुलगा होतो. माझे विश्वासघात व मंजिजे और भी हैं सारखे सिनेमे फ्लॉप झाले होते. मी चिंतीत होतो, व्यथित होतो. या काळात मी अध्यात्माकडे वळलो. मी ओशोंकडे गेलो. त्या दिवसांत पुण्यात त्यांचा करिश्मा होता. मी त्यांच्याकडे गेलो आणि स्वत:ला त्यांच्या चरणी समर्पित केलं. भगवी वस्त्र परिधान करू लागलो, पाच वेळा ध्यान करू लागलो, असं त्यांनी सांगितलं. महेश भट यांनीच विनोद खन्नाची ओशोंशी भेट घालून दिली होती. विनोद खन्ना त्यावेळी यशाच्या शिखरावर होते. पण त्यांनी अमेरिकेत ओशोंचा शिष्य बनण्यासाठी सगळं काही सोडून दिलं. विनोद खन्ना ओशोंचे शिष्य बनले, याऊलट महेश भट यांनी ओशोंपासून वेगळं होण्याचं ठरवलं. यामागे काय कारण होतं, असं विचारलं असता महेश भट म्हणाले, मी विनोद खन्नाला ओशोंकडे घेऊन गेलो होतो. पण मी ओशोंपासून दूर झालो आणि विनोद खन्ना त्यांच्यात गुंतत गेला. मी ओशोंनी दिलेली माळही तोडून फेकली. जणू मी या जगात दुहेरी आयुष्य जगत असल्याचं मला वाटतं होतं.
ओशो तुला बर्बाद करतील...
महेश भट यांनी पुढे सांगितलं की, मी परत यावं, अशी ओशोंची इच्छा होती. त्यांनी यासाठी विनोद खन्नांचा वापर केला. एकदा विनोद खन्ना यांनी मला फोन केला. भगवान खूप रागात आहे. तू माळ तोडून कमोडमध्ये फेकलीस? असं विनोद खन्ना यांनी मला विचारलं. मी म्हटलं, हो, सगळा मूर्खपणा आहे. मी मूर्ख होतो.. यावर, तू परत ये, असं भगवान म्हणत आहेत. तू स्वत: ये आणि त्यांना माळ परत कर, नाही तर ते तुला बर्बाद करतील, असं विनोद खन्ना मला म्हणाले. अर्थात मी परत गेलो नाही. ते तुला माझ्याविरोधात वापरत आहेत, असं विनोद खन्नाला समजवानू सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी ते ओशोंच्या प्रेमात होते. अर्थात यामुळे विनोद खन्ना व माझ्या नात्यात कुठलीही कटुता आम्ही येऊ नाही.