'झपाटलेला' सिनेमासाठी तात्या विंचूचं पात्र कसं सुचलं? महेश कोठारेंनी सांगितला 'तो' खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 03:51 PM2024-06-09T15:51:07+5:302024-06-09T15:51:50+5:30
तुम्हाला तात्या विंचूच्या पात्रामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का?
काही मराठी चित्रपट आणि त्यातील पात्रं ही वर्षानुवर्षे प्रेक्षकांना लक्षात राहतात. चित्रपटांमधील नायक विशेषकरून जरी प्रेक्षकांची मनं जिंकत असली तरी काही खलनायकसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. अशीच एक भूमिका म्हणजे 'तात्या विंचू'. महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेला' या चित्रपटातील 'तात्या विंचू' हे पात्रं खूप गाजलं. कोणत्याही मराठी रसिकाला हे पात्र विसरणं शक्य नाही. तुम्हाला तात्या विंचूच्या पात्रामागची इंटरेस्टिंग स्टोरी माहिती आहे का? खुद्द महेश कोठारेंनी हे पात्र कसं सुचलं याबद्दल सांगितले आहे.
महेश कोठारे यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी तात्या विंचू हे पात्राची कल्पना कशी सुचली याबाबत माहिती दिली. महेश कोठारे म्हणाले, 'रामदास पाध्ये हा माझा जुना मित्र. अगदी लहानपणापासूनचा तो माझा मित्र आहे. त्याचे वडील मला ओळखतात. एका कार्यक्रमात रामदासच्या वडिलांनी मला अर्धवटरावाच्या हातातून हार घातला होता'.
पुढे महेश कोठारे म्हणाले, 'एकदा असाच मी रामदासच्या कार्यकम्रात होतो. रामदास हा उत्तम शब्दभ्रमकार. हे त्याचे खूप चांगले कौशल्य आहे. तो बाहुला बोलतोय असं प्रेक्षकांना वाटतं. पण, रामदास त्याच्यामागून आवाज काढतोय. त्यावेळी ही कल्पना सूचली की, जर खरंच बाहुला बोलायला लागला आणि त्या बाहुल्याचा शब्द भ्रमकार लक्ष्मीकांत असेल तर हा विचार माझा डोक्यात आला. त्यानंतर मग चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला'.
महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री खूपच खास होती. महेश कोठारे त्यांच्या नवीन चित्रपटात एआयच्या मदतीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज चित्रपटात देणार आहेत. महेश कोठारे हे 'झपाटलेला ३' सिनेमाचं शूटींग करत आहेत. काहीच दिवसांपुर्वी या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सिनेमाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डेंना AI च्या माध्यमातून समोर आणण्यासाठी महेश कोठारे उत्सुक आहेत.