'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:32 IST2025-04-16T11:31:49+5:302025-04-16T11:32:52+5:30
महेश मांजरेकर आणि सलमान खानची मैत्री कशी झाली?

'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेता सलमान खानची (Salman Khan) मैत्री सर्वश्रुत आहे. महेश मांजरेकरांनी सलमानच्या 'वाँटेड','दबंग' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. इंडस्ट्रीत त्यांच्या मैत्रीची कायम चर्चा असते. मांजरेकरांच्या एका कठीण वेळी सलमाननेच त्यांना साथ दिली होती. नुकतंच त्यांनी त्या आठवणीला उजाळा दिला. कोण होता तो प्रसंग?
महेश मांजरेकर नुकतंच त्यांच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखतीत देत असताना त्यांनी सलमान खानचा किस्सा सांगितला. मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग आला होता आणि तेव्हा त्यांना मदत करणाऱ्यांमध्ये सलमान सर्वात पुढे होता. ते म्हणाले, "मी तेव्हा सलमानसोबत कोणतंही काम केलं नव्हतं. त्यावेळी मी जरा अडचणीत होतो आणि अचानक सलमानचा माझ्या लँडलाईनवर फोन आला. तो मला म्हणाला, 'काळजी करु नको, सगळं ठीक होईल'. हे मला'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे' या वाक्यासारखं वाटलं. तेव्हापासून सलमान कायम माझ्यासोबत आहे. आमच्यात मैत्री होण्याचं श्रेय मी त्याच्या प्रामाणिकपणाला देतो."
ते पुढे म्हणाले, "मला वाटतं दबंग पहिलाच सिनेमा होता. नंतर मी त्याच्या सगळ्या सिनेमात भूमिका साकारल्या. आम्ही का कोण जाणे एकमेकांशी जोडले गेलो. जे सलमानच्या प्रत्येक गोष्टीची स्तुती करतात त्या ग्रुपचा मी भाग नाहीये. मी त्याच्यासमोर खूप प्रामाणिक असतो. कधी कधी ही एक समस्याही बनते. पण मी असं यासाठी करतो कारण मला तो खरंच आवडतो. इतर लोक प्रामाणिक नाहीयेत त्यांना केवळ सलमानच्या जवळ राहायचं असतं."