Majnu Movie Review : जाणून घ्या कसा आहे, 'लागिर झालं जी' फेम 'अज्या' उर्फ नितीश चव्हाणचा 'मजनू' चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:28 PM2022-06-11T16:28:35+5:302022-06-11T16:29:26+5:30
Majnu Movie Review: 'लागिर झालं जी' फेम 'अज्या' उर्फ नितीश चव्हाणचा 'मजनू' चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. जाणून घ्या कसा आहे चित्रपट?
कलाकार : नितीश चव्हाण, रोहन पाटील, श्वेतलाना अहिरे, अरबाज शेख, मिलिंद शिंदे, सुरेश विश्वकर्मा, प्रणव रावराणे, अदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण
दिग्दर्शक : शिवाजी दोलताडे
लेखक - निर्माता : गोवर्धन दोलताडे
स्टार - दीड स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे
या चित्रपटाचं शीर्षक जरी 'मजनू' असलं तरी यात एका प्रेमी युगूलाची कहाणी पहायला मिळते. सिनेसृष्टीत एखादा फॅार्म्युला हिट झाला की त्याच पार्श्वभूमीववर पुढे शंभरेक तरी सिनेमे तयार होतात. हा सिनेमाही त्याच गाजलेल्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बनवल्याची जाणीव वेळोवेळी होते. गरीब-श्रीमंत या घासून गुळगुळीत झालेल्या फॉर्म्युल्यावर ही लव्ह स्टोरी बनवण्यात आली आहे. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांचं प्रभावहीन दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेतील कलाकारांचा सुमार दर्जाच्या अभिनयामुळं चित्रपट सुरू झाल्यापासूनच कंटाळा येऊ लागतो.
गावातील श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या आबासाहेबांच्या घरगड्याचा मुलगा विशालची ही गोष्ट आहे. बालपणापासून शिक्षणासाठी मामाकडे राहणारी आबासाहेबांची मुलगी कस्तुरी घरी परतते. विशालला भेटल्यावर ती त्याच्या प्रेमात पडते. दोघेही एकाच कॅालेजमध्ये शिकत असतात. त्याच कॅालेजमध्ये बऱ्याचदा नापास झालेला आबासाहेबांच्या जिवलग मित्राचा मुलगा सागरही शिकत असतो. सागरचा कस्तुरीवर डोळा असतो, पण विशालपुढे त्याचं काही चालत नसतं. कॅालेजमधील निवडणूक जिंकण्यासाठी सागर कोणत्याही थराला जायला तयार असतो. सागरच्या समोर निवडणूक लढवत विशाल त्याला आव्हान देतो, पण निकाल सागरच्या बाजूनं लागतो. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं.
लेखन-दिग्दर्शन : गोवर्धन दोलताडे यांनी यापूर्वी बऱ्याचदा समोर आलेलीच प्रेमकथा पुन्हा लिहिली आहे. यात रोमांचक आणि उत्कंठावर्धक वळणांचा अभाव आहे. शिवाजी दोलताडे यांनी अत्यंत सुमार दर्जाचं दिग्दर्शन करत निराशा केली आहे. लेखनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच ठिकाणी चित्रपटात चांगल्या गोष्टींची वानवा आहे. पहिल्याच भेटीत कस्तुरीला विशाल आवडू लागतो, तो नकार देत असताना ती त्याच्या गळ्यात पडते, कॉलेजमध्ये सागर जेव्हा कस्तुरीची छेड काढतो तेव्हा विशाल गप्पच असतो, मुख्याध्यापकच प्रोफेसर आणि प्राध्यापिकेचं लग्न लावून देतात, चक्क प्रोफेसर विद्यार्थ्याला पिस्तूल देतात, कॅालेजच्या कॅम्पसमध्ये तलवारी-कोयते घेऊन मुलं हाणामाऱ्या करतात, हताश झालेला विशालच कस्तुरीला एका रुममध्ये नेऊन तिचा विनयभंग करतो हा सर्व प्रकार म्हणजे बालिशपणाचा कळस वाटतो. आजवर कधीही न दिसलेली लोकेशन्स आणि सुरेख कॅमेरावर्क या चित्रपटातील जमेच्या बाजू आहेत. बऱ्याच दृश्यांमध्ये पार्श्वसंगीतच नाही. याउलट काही ठिकाणी कर्णकर्कश पार्श्वसंगीत आहे. गीत-संगीतही प्रभावी नाही. कॅास्च्युम, कला दिग्दर्शन, संकलन या सर्वच विभागांमध्ये अत्यंत ढिसाळ कामगिरी झाली आहे.
अभिनय : 'लागिरं झालं जी' फेम नितीश चव्हाण वगळता मुख्य भूमिकेतील दोघांनाही अभिनयाचा गंध नाही. नितीशनं निगेटीव्ह भूमिकाही अत्यंत प्रभावीपणं साकारली आहे. नायकाच्या रूपात रोहन पाटील आपला प्रभाव टाकण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. नायिका बनलेल्या श्वेतलाना अहिरेनंही त्याचाच कित्ता गिरवला आहे. अदिती सारंगधरनं हा चित्रपट केवळ पैशांसाठी स्वीकारला की अन्य कोणतं कारण होतं याचं उत्तर मिळत नाही. अभिनय म्हणजे केवळ संवादांचं नव्हे हे न समजणाऱ्या दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी भूमिका करण्याचा अट्टाहास का केला? सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, माधवी जुवेकर यांनी आपल्या वाट्याला आलेलं काम चांगलं केलं आहे. प्रणव रावराणेला दारूड्याच्या भूमिकेत वाया घालवलं आहे.
सकारात्मक बाजू : नयनरम्य लोकेशन्स आणि उत्तम सिनेमॅटोग्राफीखेरीज सकारात्मक वाटण्याजोगं यात काही नाही.
नकारात्मक बाजू : हा चित्रपट म्हणजे उणीवांचं भांडार आहे. लेखनापासून अभिनयापर्यंत सर्वच ठिकाणी बोंबाबोंब आहे.
थोडक्यात : अत्यंत कंटाळवाणा आणि निराशाजनक असलेला हा चित्रपट म्हणजे निव्वळ पैसे आणि वेळेचा अपव्यय आहे. त्यामुळं अशा प्रकारचा चित्रपट पहायला हवा की नाही हे प्रत्येकानं ठरवावं.