मंगेश देसाईच्या हातून निसटला ' देवदास'..
By Admin | Published: November 5, 2016 12:12 PM2016-11-05T12:12:12+5:302016-11-05T12:12:12+5:30
अभिनेता मंगेश देसाई याला 'देवदास'या चित्रपटातून वगळण्यात आले आहे.
>प्रियांका लोंढे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - 'शरदचंद्र चटोपाध्याय' यांच्या ' देवदास' कादंबरीवर आत्तापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले. दिग्दर्शक बिमल रॉय यांनी १९५५मध्ये दिलीप कुमार यांना घेऊन तर २००२ मध्ये संजय लीला भन्साळी यांनी शाहरूखसोबत हा चित्रपट केला. आता लवकरच हा चित्रपट मराठीत येत असून हरहुन्नरी ' अलबेला' अभिनेता मंगेश देसाई प्रमुख भूमिकेत दिसणार होता मात्र आता त्याला या चित्रपटातून वगळण्यात आल्याचे समोर आलं आहे.
देवदास या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋतुराज धलगुडेने लोकमत सीएनएक्सशी बोलताना ही माहिती दिली. निर्मात्यांना मंगेश हा देवदासच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. मंगेशचा 'एक अलबेला' हा भगवान दादांच्या जीवनावरील चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यामुळे प्रेक्षक त्याला देवदासच्या भूमिकेत स्वीकारतील की नाही अशी भीती निर्मात्यांना होती. म्हणूनच त्यांनी मंगेशला या चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऋतुराज यांनी सांगितले.
'देवदास' हा चित्रपट माझ्यासाठी फार महत्त्वाकांक्षी आहे. आज देवदास अनेक भाषांमध्ये तयार झाला आहे. प्रेक्षकांनी दिलीप कुमार आणि शाहरुख खानला देवदासच्या भूमिकांमध्ये पाहिले होते. त्यामुळे मराठीत देखील देवदास करताना आम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज होती. देवदास हा चित्रपट करायचा तर तो भव्य दिव्य स्वरुपातच आणि प्रेक्षकांना अपील होईल असाच करायचा, हे मी आधीच ठरविले होते. पण जर प्रेक्षकांनीच देवदासच्या भूमिकेत मंगेशला स्वीकारले नाही तर एवढी मेहनत घेऊन काहीच फायदा होणार नाही. कोणताही चित्रपट तयार होण्यासाठी निर्माता हा महत्त्वाचा असतो. निर्मात्यांच्या निर्णयापुढे मी जाऊ शकत नाही. याबाबत मी मंगेशला कळविले आहे. त्यामुळे आता आम्ही या चित्रपटासाठी देवदास, पारो आणि चंद्रमुखीची भूमिका करू शकतील अशा कलाकारांच्या शोधात आहोत. लवकरच या सर्व पात्रांची घोषणा करण्यात येईल असे दिग्दर्शक ऋतुराज यांनी सांगितले.