Indian Idol 12: पैसे घ्यायचे आणि वाईट बोलायचे यापेक्षा...; मनोज मुंतशीर यांचा अमित कुमारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:53 PM2021-05-31T18:53:40+5:302021-05-31T18:56:08+5:30
Indian Idol 12 Controversy: ‘इंडियन आयडल 12’वरून सुरु असलेला वाद सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत.
‘इंडियन आयडल 12’वरून सुरु असलेला वाद सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’ एपिसोडमध्ये स्पेशल गेस्ट बनून आलेले किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार (Amit Kumar) यांनी धक्कादायक खुलासा केला होता. स्पर्धकांचे खोटं कौतुक करायला सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या धक्कादायक खुलाशानंतर इंडस्ट्रीत जणू खळबळ माजली आहे. आता गीतकार मनोज मुंतशीर (Manoj Muntashir ) यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Manoj Muntashir speaks on Indian Idol 12 controversy)
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते या संपूर्ण वादावर बोलले. अमित कुमार शो बाहेर जाऊन बोलायचे ते बोलले. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना शोबद्दल समस्या होती तर त्यांनी शोधमध्ये यायलाच नको होते. शोमध्ये यायचे पैसे घ्यायचे आणि मग त्याच शोबद्दल वाईट बोलायचे, हे योग्य नाही. त्यामुळेच मी अमित कुमार बनू शकत नाही. मी अमित कुमार यांच्या जागी असतो आणि शोच्या प्रक्रियेबद्दल माझ्या मनात नाराजी असती तर मी तिथेच निर्मात्यांना मी शोमध्ये सहभागी होणार नाही, असे ठणकावून सांगितले असते, असे मुंतशीर म्हणाले.
स्पर्धकांबद्दलही बोलले...
इंडियन आयडल 12 ची स्पर्धक शन्मुख प्रिया हिला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. शन्मुखने अलीकडे ‘हम को सिर्फ तुमसे प्यार है’ हे गाणे गायले होते. तिच्या या गाण्यावर प्रचंड टीका झाली होती. इतकी की, हिला शोबाहेर हाकला, अशा प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंतशीर यांनी शन्मुखची पाठराखण केली. शन्मुखचा परफॉर्मन्स मला आवडतो. दानिशही खूप चांगला गातो, असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही आठवड्यांपासून इंडियन आयडल 12 अनु मलिक व मनोज मुंतशीर जज करताना दिसत आहे. अनु मलिक, हिमेश रेशमिया, विशाल ददलानी हे शोचे खरे जज सध्या काही कारणास्तव शोबाहेर आहेत.
सुनिधी चौहानने सांगितली रिअॅलिटी
इंडियन आयडल 12 वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गायिका सुनिधी चौहान हिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. मलाही अमित कुमार यांच्याप्रमाणे मला देखील स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले गेले होते. मी मेकर्सच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही म्हणून मला शोबाहेर पडावे लागले, असे ती म्हणाली.
सुनिधी ‘इंडियन आयडल’ च्या पाचव्या आणि सहाव्या सीझनची परीक्षक होती.