मनोजकुमारांसाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा का?
By Admin | Published: March 6, 2016 01:47 AM2016-03-06T01:47:39+5:302016-03-06T01:47:39+5:30
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याच्या वृत्तावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोजकुमार हैराण दिसले आणि या वृत्तावर विश्वास ठेवण्यास मला थोडा वेळ लागेल, असे त्यांनी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
संडे स्पेशल - अनुज अलंकार
मनोजकुमार यांना केंद्र सरकारने शुक्रवारी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित केला याला केवळ योगायोगच म्हणावे लागेल. या पुरस्काराबद्दल सरकारचे आभार आणि मनोजकुमार यांना शुभेच्छा.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याच्या वृत्तावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोजकुमार हैराण दिसले आणि या वृत्तावर विश्वास ठेवण्यास मला थोडा वेळ लागेल, असे त्यांनी म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मनोजकुमार यांना तसे म्हणावे वाटू शकते यामागे अनेक पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे त्यांच्या नावाची घोषणा होण्यास विलंब झालेला आहे. यंदा मनोजकुमार यांनाच हा पुरस्कार मिळेल, अशी आशा दरवर्षी व्यक्त होत होती आणि ती वर्षागणिक पुढे ढकलली जात होती. हा खेळ अनेक वर्षे चालला. या वर्षी आशा होती किंवा नव्हती, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मनोजकुमार हा पुरस्कार मिळण्यास पात्र होते. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळेल, असे वाटत होते. मनोजकुमार यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द दीर्घ आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटात देशभक्तीचा जागर केला. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमावर आधारित चित्रपटांची लाट आली असताना मनोजकुमार यांनी प्रेमाला देशभक्तीशीही जोडता येऊ शकते याची जाणीव करून दिली. मनोजकुमार हे त्यांच्या काळात राज कपूर यांच्या तोडीचे दिग्दर्शक होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, या दोन्ही महान दिग्दर्शकांचा कथा, संगीत आणि कॅमेऱ्याचा चांगला अभ्यास होता. येथे त्यांची तुलना करण्याचा हेतू नसून दोघांच्या आपापल्या शैलीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातील हातखंड्याचा मुद्दा आहे.
या आनंदाच्या समयी पुरस्कार देण्यास झालेला विलंब ही एकच खंत आहे. एवढा मोठा पुरस्कार देण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा का करायला लावली जाते याचे सरकारी व्यवस्था आत्मचिंतन करील काय हा प्रश्न आहे. या पुरस्कारासाठी आम्हा सर्वांच्या निवृत्तीचीच प्रतीक्षा का केली जाते? निवृत्तीऐवजी सक्रिय असतानाच कलावंत किंवा दिग्दर्शकास हा पुरस्कार देणे अधिक सयुक्तिक नाही का? सक्रिय कलावंतांना हा पुरस्कार दिला गेल्यास त्याचे औचित्य आणि महत्त्व दोन्हीही वाढेल. सरकारी यंत्रणा याचा कधी तरी विचार करील, अशी आशा आहे. मनोजकुमार यांना पुन्हा एकदा सलाम. त्यांनी या पुरस्काराला एक नवा आयाम दिला आहे.