'पैसे परत करणार होतो.पण..'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली होती भाऊ कदमकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 11:45 AM2021-12-16T11:45:00+5:302021-12-16T11:45:00+5:30
Bhau kadam: झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे.
उत्तम विनोदशैलीच्या जोरावर प्रेक्षकांचं अवितरपणे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम( bhau kadam). झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदम यांचं नाव आवर्जुन घेतलं. जातं. अलिकडेच भाऊची मुख्य भूमिका असलेला 'पांडू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाने होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भाऊंनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, या आठवणी सांगत असतांना ते प्रचंड भावूक झाले.
"इव्हन दुबईला गेलो मी तेव्हा पैसेच नव्हते माझ्याकडे. पासपोर्ट किंवा इतर सगळा खर्च मांजरेकर.आपण फक्त जायचंय. त्यामुळे पैशांची काही तशी गरज नव्हती. पण जातांनाच पैसे नव्हते. फक्त खिशात काही तरी असावेत म्हणून मित्रांकडे मागितले. १-२ हजार किंवा ५ हजार द्या मला. पण, त्यांना ती शाश्वती नव्हती की मी पैसे परत करेन का? मी परत करणार होतो. काहीतरी करुन ते देणारच होतो", असं भाऊ म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "शेवटी घरच्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणाले हे घे, हे ठेव. त्यावर मी विचारलं की हे पैसे कुठून आले. तर ते म्हणाले की अंगठी विकली. आणि, वरुन म्हणाले यातून काहीही पैसे परत आणू नका. तुम्ही वापरा. पण मे पैसे खर्च करायची माझी डेरिंगच झाली. फक्त मुलांसाठी काही गोष्टी घेऊन आलो."
दरम्यान, भाऊ कदम हा संपूर्ण प्रवास सांगत असतांना त्यांच्या पत्नीच्या आणि लेकीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग भारावून गेला होता. काही दिवसांपूर्वीच भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असलेला 'पांडू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात भाऊंसोबत कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांनी स्क्रीन शेअर केली आहे.