'या' गोष्टीमुळे चिराग पाटीलने नाकारलं सेटवरचं जेवण; कारण जाणून तुम्ही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:36 PM2022-04-12T19:36:06+5:302022-04-12T19:37:10+5:30

Chirag Patil: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिराग पाटील साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनयासह तो फिटनेसमुळेही ओळखला जातो.

marathi actor Chirag Patil refused the meal on the set | 'या' गोष्टीमुळे चिराग पाटीलने नाकारलं सेटवरचं जेवण; कारण जाणून तुम्ही कराल कौतुक

'या' गोष्टीमुळे चिराग पाटीलने नाकारलं सेटवरचं जेवण; कारण जाणून तुम्ही कराल कौतुक

googlenewsNext

सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेस फ्रीक झाला आहे. यात खासकरुन कलाकार मंडळी हे डाएट अत्यंत काटेकोरपणे पाळतात. मग मालिका असो वा चित्रपटाचा सेट  ही मंडळी कुठेही असली तरीदेखील त्यांच्या ठरलेल्या टाइमटेबलनुसारचं जेवण करतात. त्यातच कोणत्याही प्रोजेक्टचं चित्रीकरण सुरु झालं की ते नेमकं कधी संपेल याची खात्री नसते. त्यामुळे अनेक सेटवर कलाकार व अन्य कर्मचाऱ्यांसाठी चहापाणी आणि जेवणाची सोय केलेली असते. म्हणूनच, अनेक कलाकार मंडळी सेटवरच आपलं जेवण घेतात. मात्र, यात सध्या एक अभिनेता सेटवरील जेवण न घेत असल्यामुळे चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर तो मुद्दाम सेटवरचं जेवण टाळतो असंही म्हणत काही जणांनी नाकं मुरडली होती. परंतु, या अभिनेत्याने काहीही न बोलता त्याच्या कृतीतून त्याच्या अशा वागण्यामागील कारण सांगितलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता चिराग पाटील साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनयासह तो फिटनेसमुळेही ओळखला जातो. सध्या चिराग 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. त्यामुळे दिवसातील बराचसा वेळ तो सेटवर घालवत असतो. मात्र, या काळात तो न चुकता कायम घरुन जेवणाचा डबा घेऊन येतो. त्यामुळे  हा सेटवरचं जेवण का घेत नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसंच काही जणांची त्याची खिल्लीही उडवली. मात्र, त्याने एक भन्नट शक्कल लढवत त्याच्या या कृतीमागचं कारण सांगितलं.

सेटवरील जेवणात चिरागने घडवला बदल

चिरागविषयी सुरु असलेल्या चर्चा त्याच्या कानावर आल्या. त्यामुळे त्याने सेटवर जेवण्याची सर्व्हिस देणाऱ्या केटरर्सला स्वतः भेटून पुढील तब्बल ५ दिवस खाण्याचा सोडा, नॉन व्हेज, फूड कलर या गोष्टींशिवाय जेवण बनवायला सांगितले. आता खुद्द सिनेमाचा नायकचं आपल्याला सांगतो तर आपल्याला हे ऐकावंच लागेल असा विचार करत केटरर्सनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवसापासून हेल्दी जेवण सेटवर यायला लागलं. सुरुवातीला लोकांनी हे जेवण पाहिल्यावर नाक मुरडलं. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसांपासून सर्वांनीच शाकाहारी जेवणाची सवय झाली. इतकंच नाही तर सेटवरील अनेकांमध्ये कामाचा उत्साह वाढला. जेवणानंतर येणारी सुस्ती, कंटाळा अनेकांचा कमी झाला. मात्र, तरीदेखील काही जणांनी चिरागने असं का केलं हे जाणून घेण्यासाठी त्याला प्रश्न विचारले. त्यावर," सेटवरच्या जेवणाला माझा कधीच विरोध नाही, पण कधी कधी जास्त क्वांटिटी असलेल्या जेवणात खाण्याचा सोडा मिसळला जातो. आता त्याचे परिणाम दिसत जरी नसले तरी त्याचे परिणाम आपल्या उतरत्या वयात नक्कीच दिसतात त्यामुळे खाण्याचा सोडा न खाल्लेला बरा. शिवाय नॉन व्हेजचे अतिसेवन देखील त्रासदायक असते. शाळेत असल्यापासून आईने बनवलेल्या घरच्या डब्याची माझी सवय कधीच सुटली नाही हे ही तितकंच खरं!", असं उत्तर देत मी कायम घरचा डबा का आणतो हे त्यांने सांगितलं.

...म्हणून घरचा डबा घेऊन येतो चिराग

"मी कायम घरच्या जेवणाला प्राधान्य देतो. आणि, म्हणून मी जिथेही जातो तिथे माझ्यासोबत माझ्या घरचा डब्बा सोबतच असतो. कधी घरापासून लांब जास्त दिवसांच्या शूटिंगचा प्लॅन असेल तर आईने शिकवलेले बेसिक कुकिंग त्यावेळी कामी येते. त्यामुळे बाहेरचं किंवा सेटवरचं जेवण खाणं मी शक्यतो टाळतो. माझ्यासोबत काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मला आदर आहे. शिवाय त्यांच्या तब्येतीचादेखील मी विचार करतो. असं केल्याने जर मी त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारत असतील तर माझ्या मते मी चांगलंच केलं असं वाटतंय," असं चिराग म्हणाला.

दरम्यान, बाहेरील पदार्थांमधील सोडा, फूड कलर, नॉनव्हेज पदार्थ खाऊन त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ नये यासाठी चिराग कायम घरचा डबा आणतो. चिराग पाटीलचा "मराठी पाऊल पडते पुढे" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो एक निर्भीड उद्योजकाची भूमिका साकारत आहे. 

Web Title: marathi actor Chirag Patil refused the meal on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.