...आणि 'नवरा माझा नवसाचा' मधून प्रशांत दामलेंचा झाला पत्ता कट; जयवंत वाडकरांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:18 PM2024-09-03T14:18:10+5:302024-09-03T14:22:03+5:30
सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १९ वर्षे उलटून गेली आहेत.
Jaywant Wadkar Reaction On Navra Majha Navsacha : सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १९ वर्षे उलटून गेली आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात मुंबई ते गणपतीपुळे अशी एसटीमधील रंजक कॉमेडी सफर पाहायला मिळाली. त्यावेळेस अभिनेते सचिन पिळगावकर तसेच सुप्रिया पिळगावकर या एव्हरग्रीन जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. शिवाय त्यातील गाणी, संवाद प्रेक्षकांच्या आजही तोंडपाठ आहेत.
अशातच नुकतीच अभिनेते जयवंत वाडकर यांनी 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीत 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यामध्ये अभिनेते जयवंत वाडकर एका घोरणाऱ्या गृहस्थाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी साकारलेलं ते पात्र चाहत्यांना प्रचंड आवडलं होतं. पण, या चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले देखील झळकले असते पण काही कारणांमुळे त्यांचा सीन कट करण्यात आला. असा खुलासा जयवंत वाडकरांनी या मुलाखतीत केला.
या मुलाखती दरम्यान जयवंत वाडकरांनी असंख्य गोष्टींचा उलगडा केला. तेव्हा त्यांना 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटातील अनुभवांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, "नवरा माझा नवसाचा' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी आम्ही यशवंत नाट्यमंदिरात बसलो होतो. तिथे मी आणि संतोष पवार चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत होतो. आणखी कलाकार मंडळीही त्याठिकाणी उपस्थित होती. तेव्हा स्क्रिप्ट वाचताना आम्ही घड्याळ लावलं होतं. तिथे सचिन पिळगावकरांनी सव्वा तीन तास स्क्रिप्टचं वाचन केलं. तेव्हा तीन तासांची स्क्रिप्ट आहे मग चित्रपट किती मोठा असेल? हे पाहून त्याक्षणी मी आणि विजय पाटकर एकमेकांकडे बघत बसलो.
पुढे ते म्हणाले, "त्याच दरम्यान, तिकडे प्रशांत दामलेही होता तेव्हाच प्रशांतचं अख्खं कॅरेक्टर उडवलं. तिथूनच प्रशांत गायब झाला. चित्रपटात तो देखील प्रवासात येतो अंताक्षरी खेळतो अशी त्याची भूमिका होती पण त्याचा सिनेमातून सीन कट करण्यात आला".
'नवरा माझा नवसाचा' मध्ये सचिन पिळगावर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ,जॉनी लिव्हर, जयवंत वाडकर, रीमा लागू, निर्मिती सावंत, वैभव मांगले यांसोबतच विजय पाटकर यांसारखी तगडी स्टाकास्ट पाहायला मिळाली.