VIDEO : हे तूच करू शकतोस राव..., नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ पाहून जितेन्द्र जोशी भारावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:24 PM2022-03-04T14:24:02+5:302022-03-04T14:27:51+5:30
JHUND : अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप असलेला चेहरा... ‘झुंड’ अगदी तसाच आहे. तीन दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला...काय सिनेमा केलाये त्याने...अशा शब्दांत जितेन्द्र जोशी याने नागराज यांचं कौतुक केलं.
नॅशनल अवॉर्ड विनर दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित ‘झुंड’ आज प्रदर्शित झालाय आणि सध्या सर्वत्र या आणि याच चित्रपटाची चर्चा आहे. अगदी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे. मराठी अभिनेता सुबोध भावे यानेही ‘झुंड’आणि नागराज यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता जितेन्द्र जोशी ( Jitendra Joshi) याने तर या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज यांच्यावर कौतुकाचा असा काही खुद्द नागराजही भारावले.
काही क्षणांपूर्वी जितेन्द्र जोशीने नागराज यांच्यासोबतीने इन्स्टावर लाईव्ह येत ‘झुंड’चं भरभरून कौतुक केलं. ‘झुंड’सारखा सिनेमा फक्त नागराजचं करू शकतो. तू महानायक आणि महामानवाला एका फ्रेममध्ये आणलंस...,’ अशा शब्दांत त्याने नागराज यांचं कौतुक केलं.
अजिबात न लपवलेला, विदाऊट मेकअप असलेला चेहरा... ‘झुंड’ अगदी तसा आहे. तीन दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पाहिला...काय सिनेमा केलाये त्याने. अमिताभ बच्चन... असा बच्चन मी पाहिलाच नाही. सगळी नवी पोरं तर कम्माल आहे. लई डेंजर... फारच डेंजर पिक्चर बनवलाय... म्हणून मी लाईव्ह करतोय, असं जितेन्द्र म्हणतो आणि यानंतर त्याच्यासोबत नागराज सुद्धा लाईव्ह येतात.
काय म्हणाला जितेन्द्र जोशी...
‘झुंड’ सारखा सिनेमा बनवला याबद्दल एक मित्र म्हणून, या समाजाचा एक नागरिक म्हणून मी तुझे आभार मानतो. तू अशा पद्धतीचा सिनेमा काढून तू माझ्यावर, माझ्या पोरीवर, समाजावर उपकार करतोय. तुला कौतुक आवडत नाही. पण मी आज बोलणार आहे. तीन दिवस झालेत सिनेमा बघून, पण हा सिनेमा मनातून हलतचं नाहीये रे...आमिर कौतुक करतोय, धनुष करतोय. त्यांना कौतुक करावंच लागेल. ही कलेची जबरदस्ती आहे.
तू बच्चन साहेबांना ‘बच्चनगिरी’ करूच दिलीस नाहीस... खरी बच्चनगिरी तर तुझ्या पोरांनी केली. ही कमाल फक्त नागराजचं करू शकतो.हे फक्त तुलाच जमतं राव.... नागराज तू असाच राहा, असेच जगणं दाखवणारे सिनेमे बनव...., तू सगळंच कर....अभिनय कर, सिनेमे बनव...अशा शब्दांत जितेन्द्र नागराज यांच्याबद्दल भरभरून बोलला.
जितेन्द्र इतकं भारावून बोलत होता की, नागराज यांना त्याचे आभार मानण्यासाठी शब्द सुचेनात. तू संवेदनशील अभिनेता आहेस आणि म्हणून तू केलेलं कौतुक खरं आहे. सिनेमाचं आणि माझं कौतुक केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो, असं नागराज त्याला म्हणाले.