कालपासून तिची खूप आठवण येतेय..., जितेन्द्र जोशीनं ‘रमा’साठी शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 03:36 PM2021-11-03T15:36:59+5:302021-11-03T15:37:58+5:30

रमा, मी आणि दिवाळी... जितेन्द्र जोशीची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.

marathi actor jitrendra joshi share post for her grandmother for diwali | कालपासून तिची खूप आठवण येतेय..., जितेन्द्र जोशीनं ‘रमा’साठी शेअर केली भावूक पोस्ट

कालपासून तिची खूप आठवण येतेय..., जितेन्द्र जोशीनं ‘रमा’साठी शेअर केली भावूक पोस्ट

googlenewsNext

दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहतोय. घराघरात दिवाळीच्या फराळाचा घमघमाट, रंगीबेरंगी रांगोळी, फटाक्यांची आतीषबाजी असा सगळा उत्साह आहेत. सेलिब्रिटीही मागे नाहीत. दिवाळीच्या निमित्तानं एक ना अनेक पोस्ट, फोटो आठवणी सेलिब्रिटी शेअर करत आहेत. मराळमोळा अभिनेता जितेन्द्र जोशी (Jitrendra Joshi) याने दिवाळीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. रमा, मी आणि दिवाळी... या शीर्षकाची त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
कालपासून रमाची खूप आठवण येतेय... अशी सुरूवात करत त्याने ही पोस्ट लिहिली आहे. आता ही रमा कोण तर जितेन्द्र जोशीची आजी.
यावर्षी 29 एप्रिलला त्याच्या आजीचं निधन झालं. दिवाळी आली आणि जितेन्द्रच्या मनात आजीच्या आठवणींचं काहूर माजलं. याच आठवणी त्याने या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत.

तो लिहितो...

रमा , मी आणि दिवाळी

आज दिवाळी चा दुसरा दिवस!
खरंतर कालपासून रमा ची माझ्या आजी ची खूप आठवण येतेय. दिवाळी येण्यापूर्वी आमचं छोटं गरीब घर रमा आणि तिच्या मुलांच्या मेहनतीने घासून पुसून दर 4-5 वर्षात स्वहस्ते रंग देऊन लख्ख व्हायचं आणि फराळाची तयारी सुरू व्हायची. घरात बाहेरून विकतचा फराळ तेव्हा आणला जात नसे. चकल्या, लाडू, करंजी, अनारसे, शेव वगैरे जे जे असतं ते सगळं ती आणि माझी आई, मोठी मामी बनवायची आणि मग चिवडा बनवताना त्यात टाकायला म्हणून बाजूला ठेवलेले शेंगदाणे आणि खोबरं खाल्लं की तिचा मार मिळायचा . घरातला फराळ तयार झाला की आधी तो शेजारी पाजारी नेऊन द्यायचा आणि दिवाळीत दररोज घराबाहेर रांगोळी काढली जायची म्हणून जमीन सारवायला शेण आणायची जबाबदारी माझी असायची.
वर्षात एक नवीन शर्ट पँट मिळायची ती दिवाळी ला ती घालून वाड्यात सर्वाँना नमस्कार करायला ती पाठवायची. रमा सर्व आल्या गेल्या पाहुण्यांची सरबराई तर करायचीच परंतु मला घेऊन असंख्य नातेवाईकांकडे घेऊन जायची. पहिल्या घरात गेल्यावरच इतका फराळ मी खायचो की शेवटच्या घरी केवळ एखादा लाडू किंवा चकली पोटात जायची. आमच्या घराने छोटे छोटे असंख्य उद्योग केले त्यात होलसेल चे फटाके आणून सुटे विकणे , आकाशकंदील तयार करून ते विकणे वगैरे गोष्टीत आमच्या सोबत ती सुद्धा असायची. स्वस्थ बसणं तिच्या प्रकृती मध्ये नव्हतं. तत्पर , उर्जावान, रसिक , हौशी अशा अनेक शब्दांचे अर्थ तिच्या ठायी आनंदाने नांदत आणि खरे ठरत होते.
29 एप्रिल 2021 रोजी तिचं निधन झालं . तिच्या हाताच्या लापशी प्रमाणेच गोड आवाजात " जितू happy diwali" असं म्हणून येणारा फोन आता येणार नाही. माझी रेवा जन्माला आली त्यानंतरच्या एका दिवाळीला ती माझ्याकडे होती तेव्हा मी रेवाच्या पावलांना कुंकू लावून त्याचे ठसे घेऊन लक्ष्मी पूजन केल्याचं तिला कोण कौतुक होतं!! कालपासून अनेक लोकांचे मेसेज , फोन सुरू झाले दिवाळीच्या शुभेच्छांचे पण खरं सांगू माझ्या आयुष्यातला सौम्य माया पाझरणारा दिवा विझला त्यामुळे थोडं सुनं सुनं वाटतंय.
तिला दम्याचा त्रास असल्याने फटाक्यांचा वास घरात नको म्हणून खिडक्या लावून घेणारे आम्ही आज खिडक्या उघड्या ठेवून बसलोय बाहेरचे दिवे पहात.
दरवर्षी तुळशीचं लग्न लागलं की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शिल्लक राहिलेला ऊस मी आणि ती दोघे बसून खायचो. इतका जास्त की नंतर तोंड येत असे. ती माझ्यासाठी एक मारवाडी म्हण नेहमी म्हणायची की

" गेली सासरे जावे नई और जावे तो पाच्छी आवे नई"
म्हणजे वेडी मुलगी सासरी जातंच नाही आणि गेली तर परत माघारी येतही नाही.
आज समजतंय मला..
 

Web Title: marathi actor jitrendra joshi share post for her grandmother for diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.