"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:35 PM2024-08-20T15:35:08+5:302024-08-20T15:39:39+5:30

मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.

marathi actor kiran mane post on dr narendra dabholkar memorial day on social media  | "अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट 

"अडचणी मिटतील या आशेपोटी माणूस कशावरही..." डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिनी अभिनेत्याची सूचक पोस्ट 

Kiran Mane Post : मराठी अभिनेते किरण माने त्यांच्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते आपली मते तसेच भूमिका रोखठोकपणे मांडत असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय मुद्यांवर ते आपलं मत व्यक्त करताना दिसतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. २० ऑगस्ट या दिवशी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने अभिनेत्याने एक भली-मोठी पोस्ट शेअर केली आहे. 


किरण माने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी समाजातील बुवाबाजी, अंधश्रद्धा यावर भाष्य केलं आहे. या व्हायरल पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय, "छे छे... अरे किरण, मित्रा दोन हजार चोविस साल आहे हे. आता कुठे राहिली आहे बुवाबाजी? आता लोकांना हवेतून अंगारा वगैरे काढणे हे सगळं थोताड आहे हे कळलंय. लोक हुशार झाले आहेत. विज्ञान शिकलेत.  तर्जनीतल्या अंगठीशी चाळा करत माझा एक अभिनेता  मित्र असं मला म्हणाला. मी विषय बदलत त्याला विचारलं, तुझ्या अंगठीत खडा आहे तो माणिक आहे का? त्यावर तो खळखळून हसला. पुष्करा असं म्हणत त्याने तो खडा माझ्या कपाळाला लावला. को ऊं बृं बृं  नम असं कायतरी तो पुटपुटला आणि म्हणाला गुरुजींनी घालायला सांगितला. मनासारखं कामच मिळत नाही रे! पैसा मिळाला तर तो टिकत नाही. पुष्कराजमुळे फरक पडेल असं गुरुजी म्हणालेत. वडिलांच्या पेन्शनचे पैसे उसने घेऊन ही अंगठी घेतली. असं म्हणत पुन्हा त्याने तो खडा त्याने कपाळाला लावला. हीच ती बुवाबाजी असं मला त्याला मनापासून सांगावसं वाटलं. आपल्या संपूर्ण आयुष्याची सगळी झंझट मिटवायला. एखाद्या ज्योतिषाने चमत्कार करावा, कोणीतरी बुवाबापु आपल्या सगळ्या अडटचणी मिटवेल, या आशेपोटी  माणूस कशावरही विश्वास ठेवायला लागला आहे".

पुढे अभिनेत्याने लिहलंय, "रोज चमटचाभर शेण खा तुम्हाला मुलगा होईल असं सांगितलं तरी विश्वास ठेवला. रोज गोमुत्र प्या कॅन्सर होणार नाही. अमकीकडे गुप्त खजिना आहे. पाच लाख रुपये खर्चून विधी करावा लागेल. ठेवला विश्वास. लोक राहत्या घराच्या भिंती पाडून स्वयंपाकघर इकडे आणि पलंग तिकडे असं करायला लागली आहेत.  कमोडवर बसल्यावर आपलं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील गुरुजी सांगायला लागले आहेत. सगळं कुठपर्यंत पोहचतं आहे माहित आहे का? ही क्रिम वापरा, सात दिवसात गोरा रंग! हा साबण वापरून अंग धुवा, दिवसभर फ्रेश! अरे, भावा कोणताही परफ्युम अंगावर फासल्यावर मुली तुझ्यामागे पळायला आई-बहिणी उघड्यावर पडल्या आहेत का? मला सांगा २०२४ साली देखील अशा खोट्या स्वप्नांना भुलणारी माणसे आहेत की नाहीत? विज्ञानाने दिलेल्या मोबाईलपासून चष्म्यापर्यन्त सगळं रोज आपण वापरतो. पण दिवसेंदिवस तर्कशुद्ध आणि विवेकी विचारांपासून आपला मेंदू कित्येक मैल दूर चालला आहे. आज डाॅ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतीदिन. आपला समाज या अशा फसवणुकीतनं बाहेर पडावा. समाजात विज्ञानदृष्टी यावी, विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, यासाठी दाभोलकरांनी प्राणांची आहुती दिली. आपण कधी जागे होणार? अहो, समाजाला कर्मकांडातुन अंधश्रद्धेतुन बाहेर काढू पाहाणार्‍या तुकोबारायांना असंच वैकुंठाला मारेकर्‍यांनी पाठवलं होतं. जाता-जाता तुका कळकळीने सांगून गेले, "आता तरी पुढे हाचि उपदेश;  नका करू नाश आयुष्याचा ! सकळांच्या पाया माझे दंडवत.. आपुलाले चित्त शुद्ध करा !! तुका म्हणे हित होय तो व्यापार.. करा, फार काय शिकवावे ???" असं लिहित त्यांनी अनेकांचे कान टोचले आहेत.

Web Title: marathi actor kiran mane post on dr narendra dabholkar memorial day on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.