"या दोघांच्या अशा स्वभावामुळे माझी झोप उडाली..." कुशल बद्रिकेने शेअर केला बायको-मुलाचा मजेशीर व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 05:26 PM2024-09-24T17:26:03+5:302024-09-24T17:27:29+5:30
आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.
Kushal badrike Video : आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कॉमेडिचं अचूक टायमिंग साधत त्याने कायमच खळखळून प्रेक्षकांना हसवलं. विनोदाचा बादशाह म्हणून ओळख असलेला हा अभिनेता वेगवेगळे चित्रपट, मालिकांधून काम करत लोकप्रिय झाला. नुकताच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर त्याची बायको आणि मुलाचा एक गमतीदार व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कुशलने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये त्याने लाडक्या लेकाची आणि बायकोची स्वभाव वैशिष्ट्ये दाखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय, आमची “ही” लग्नात शपथ घेऊन म्हणाली होती की “साता जन्माचा प्रवास एकत्र करू” म्हणून . पण प्रवासात “ही” झोपून राहील अशी शंका मला झोपेत सुद्धा आली नाही. आमच्या लग्नानंतर काही काळ आम्ही चाळीत राहिलोय तेंव्हाची गोष्ट सांगतो, मी शूटिंग संपवून रात्री उशिरा घरी आलो, दार वाजवून वाजवून थकलो, हिने जवळ जवळ अर्धातास दार उघडलं नाही. आतून फोन सुद्धा उचलेना .मी घाबरलो आणि स्वतःच्याच घरात मागच्या खिडकीने चोरासारखा आत शिरलो पहातो तर आमचा कुंभकर्ण ढाराढूर झोपलेला. हल्लीची गोष्ट सांगतो मी एका हिंदी शोचं शूट आटपून उशिराने घरी पोचलो. (आता मी आठवणीने घराची किल्ली घेऊन जातो) तर हिला झोपेतच कुणाची तरी चाहूल लागली आणि हिला वाटलं की घरात चोर शिरलाय .त्यावर उपाय म्हणून माझी बायको झोपूनच राहिली, की उगाच मग चोराला वाटेल की आम्ही जागे आहोत आणि मग तो आम्हाला त्रास देईल" .
पुढे अभिनेता म्हणतो, "माझी खात्री आहे की देव कोअला (Koala) नावाचा प्राणी बनवायला गेला असणार, जो दिवसातून 18 तास झोपतो! आणि त्याची रेसिपी चुकल्या मुळे आमच्या सुनयनाचा जन्म झाला असणार हिचा हाच स्वभाव माझ्या मुलात सुद्धा उतरलाय. ऐन परीक्षेत बारा बारा तास झोपून रहातो यार. “अश्या अर्थाने स्वतःच्या आई ची गादी चालवणारा मुलगा महाराष्ट्रात माझ्याच घरात जन्माला आला”. असं म्हणायला हरकत नाही. या दोघांच्या अश्या स्वभावामुळे आता “माझी” मात्र झोप उडाली आहे. यावर उपाय म्हणून माझी बायको मला म्हणते, कुशल… थोडा वेळ झोप , तुला बरं वाटेल".
व्हिडीओमध्ये कुशलने त्याची बायको आणि मुलाचे झोपेतील काही क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्याच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत." खरंतर त्यांनी तुमच्या उडालेल्या झोपेवर रामबाण उपाय सांगितला, झोप थोडा वेळ..." अशी कमेंट देखील एका नेटकऱ्याने अभिनेत्याच्या व्हिडीओवर केली आहे.