प्रशांत दामलेंचं वेबविश्वात पदार्पण; महेश मांजरेकरांच्या 'या' सीरिजमध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:30 PM2022-08-26T12:30:00+5:302022-08-26T12:30:00+5:30
Prashant damle: महेश मांजरेकर यांच्या 'एका काळेचे मणी' या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रशांत दामले ओटीटीवर पदार्पण करत आहेत.
रंगमंच दणाणून सोडणारा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रशांत दामले (prashant damle). आजवरच्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपट, नाटकं करणारे प्रशांत दामले यांच्याकडे आज गुणी आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलं जातं. असंख्य गाजलेल्या नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे प्रशांत दामले लवकरच वेब विश्वात पदार्पण करत आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता महेश मांजरेकर (mahesh manjarekar) यांच्या 'एका काळेचे मणी' या वेब सीरिजच्या (web series) माध्यमातून प्रशांत दामले ओटीटीवर पदार्पण करत आहेत. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. जिओ स्टुडिओ निर्मित या सीरिजमधून एक कौटुंबिक कथा उलगडली जाणार आहे. मध्यवर्गीय मराठी कुटुंबाची ही हटके कथा असून त्यात अनेक हास्याचे फवारे उडवले जाणार आहेत.
“मला आनंद आहे की आम्ही 'एका काळेचे मणी' या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासारखे मोठे व्हावे आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. पण या सीरिजमध्ये इथेच खरी गंमत सुरु होते. कारण, सध्याच्या जनरेशनच्या आवडीनिवडी या भन्नाट, वेगळ्या असतात, आणि त्यामुळेच आपल्या दैनंदिन आयुष्यात एका विरोधाभास आणि धमाल निर्माण होते. आणि हीच जुन्या विरूद्ध नव्या विचारांची गंमत जंमत या सीरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे”, असं महेश मांजरेकर म्हणाले.
या सीरिजमध्ये प्रशांत दामले यांच्यासह हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, रुतुराज शिंदे,समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार ही दिग्गज कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकर यांनी या सीरिजची निर्मिती केली असून या वेबसीरिजचं दिग्दर्शन अतुल केतकर यांनी केले आहे. तर या सीरिजची संकल्पना ऋषी मनोहर याची असून ओम भूतकर याने याचे लिखाण केले आहे.