“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:40 AM2023-07-15T10:40:57+5:302023-07-15T10:44:45+5:30
दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
७० ते ९०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं आकस्मित निधन झालं आहे. शुक्रवारी(१४ जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी बंद खोलीत आढळला. ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी रवींद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
अशोक सराफ म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीतील ही फार वाईट घटना आहे. तो माझा चांगला मित्र होता. आम्ही अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न होतं. रवींद्र मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट होता. त्याच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावला आहे. मराठी चित्रपटसृष्टीने देखणा नट गमावल्याचं दु:ख आहे. हे दु:ख भरुन येण्यासारखं नाही. सुंदर दिसण्याबरोबरच कामंही उत्तम करणारा तो एकमेव नट होता.” लोकशाही या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अशोक सराफ भावुक झाले होते.
अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.