शरद पोंक्षेंनाही निवडणूक लढवण्याची इच्छा? म्हणाले, 'या' मतदारसंघाचं करायचंय प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 01:51 PM2024-03-30T13:51:10+5:302024-03-30T13:51:51+5:30
शरद पोंक्षे अभिनेते तर आहेतच पण ते नेहमीच राजकीय, सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडत असतात.
सध्या सगळीकडे राजकीय वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अगदी मनोरंजनक्षेत्रातही राजकारणाचीच चर्चा आहे. कंगना राणौत तर लोकसभा लढवणार आहेच शिवाय अभिनेता गोविंदाने नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय. इकडे मराठी कलाविश्वात अभिनते शरद पोंक्षेंनी (Sharad Ponkshe) नुकतीच त्यांची इच्छा बोलून दाखवली आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायला आवडेल यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
शरद पोंक्षे अभिनेते तर आहेतच पण ते नेहमीच राजकीय, सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत मांडत असतात. काहीवेळा त्यांची विधानं वादग्रस्तही ठरतात. एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात शरद पोंक्षेंनी निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "मला विचारणा झाली तर नक्कीच निवडणूक लढवायला आवडेल. मी बोरिवलीत राहतो. त्यामुळेच याच मतदारसंघातून निवडणूक लढवायची माझी इच्छा असेल. जिथे आपण राहतो तेथील परिसरातील लोक आपल्याला ओळखतात. भलत्याच ठिकाणचे लोक कसे ओळखतील? आपल्या परिसरातील लोकांसाठी लढावं. मत द्यायचं की नाही लोक ठरवतील पण आपलं काम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटतं."
ते पुढे म्हणाले, "सध्याचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे. पातळी सोडून सर्वकाही सुरु आहे. पण हे प्रत्येक क्षेत्रात कधी ना कधी घडतंच. हे काही कायम राहणारं नाही. यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे."
शरद पोंक्षे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. कॅन्सरवर मात करुन ते पुन्हा जोमाने काम करत आहेत. सिनेमा, नाटक यामध्ये नेहमीसारखंच ते स्वत:ला झोकून काम करत आहेत. राजकीय मतभेद काहीही असले तरी त्यांच्या अभिनयाचे सर्वच चाहते आहेत.