'लॉजिक विसरा अन् धंदा करत रहा हे..'; 'आदिपुरुष'विषयी शशांकचं परखड मत
By शर्वरी जोशी | Published: June 19, 2023 12:57 PM2023-06-19T12:57:16+5:302023-06-19T13:12:01+5:30
Shashank Ketkar: सिनेमा चांगला की वाईट यावर भाष्य न करता शशांकने केवळ त्याचं मत मांडलं आहे.
दिग्दर्शक ओम राऊत (Om raut) याच्या 'आदिपुरुष' (adipurush) या सिनेमाची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. सिनेमातील संवाद, व्हिफक्स, कलाकारांचे कपडे यावर नेटकरी टीकास्त्र डागत आहेत. इतकंच नाही कलाविश्वातील काही दिग्गज कलाकारही या सिनेमाविषयी त्यांचं मत मांडतांना दिसत आहेत. यामध्येच लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने त्याचं परखड मत मांडलं आहे.
शशांकने नुकताच 'लोकमत ऑनलाइन'सोबत संवाद साधला. यावेळी त्याने 'आदिपुरुष' या सिनेमाविषयी त्याचं मत मांडला. 'मी या सिनेमाला पाठिंबाही देत नाही कारण मी तो पाहिलेला नाही. आणि, त्यावर टीकाही करणार नाही कारण, सिनेमाची निर्मिती करताना मेकर्सने काही तरी विचार करुनच तो केला असेल', असं म्हणत त्याने त्याचे विचार मांडले आहे.
"मी पठाण पाहिलेला आहे. पण, आदिपुरुष पाहिलेला नाही. दुसरं म्हणजे पठाणचं सांगायचं झालं तर फायटिंगचे सिनेमे केले पाहिजेत. पण, फिजिक्स विसरुन फायटिंग केली तर हसू येतं. केवळ बिझनेसच्या नावाखाली आपण जे टेलिव्हिजनवर करतोय तेच सिनेमात होताना दिसतंय. 'लोक बघतायेत ना मग लॉजिक विसरा अन् धंदा करत रहा,' हे लॉजिक मला टेलिव्हिजनवर दाखवताना सुद्धा पटत नाही. त्यामुळे आपण जे करतोय त्यात लॉजिक, नात्यांची नीट गुंफण हे सारं काही आपण नीट करु शकलो की नक्कीच ती गोष्ट चांगली होते, असं शशांक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याकाळी जे देवदेवता होते, राजे-राजवाडे होते वा राक्षस असतील ते कसे दिसायचे, कसे वागायचे हे आपण कोणीच पाहिलेलं नाही. आपण कायम ते देवळं, पुस्तक किंवा जुन्या मालिकांमधूनच अनुभवलं आहे. त्यामुळे आपण एखादी निर्मिती करताना त्यातली भाषा सांभाळली पाहिजे. आपली संस्कृती पाहता सगळ्या गोष्टींचा नीट विचार करता एखादी कलाकृती केली पाहिजे. परंतु, सिनेमा करणाऱ्याचा तो निर्णय आहे की त्यांना तो कसा सादर करायचा आहे. याविषयी माझं मत पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे जे टेलिव्हिजनला वापरलं जातं तेच सिनेमाला आता लागू होणार आहे का? की 'लॉजिक वगैरे कुछ नहीं होता'. सीनवर सीन करत रहायचं. 'लोक बघतायेत ना मग बघत रहा, धंदा करत रहा.
दरम्यान, सिनेमा चांगला की वाईट यावर भाष्य न करता शशांकने केवळ त्याचं मत मांडलं आहे. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर आदिपुरुष विषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. प्रेक्षकांनी आदिपुरुष या सिनेमात अनेक त्रुटी काढल्या आहेत. यात सैफ अली खानचे कपडे, देवदत्त नागे याचे संवाद, प्रभासने केलेला श्रीरामांचा लूक यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर रामायणाच्या मूळकथेशी छेडछाड केल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे.