मराठी अभिनेता जेव्हा बॉलिवूडच्या HE MAN ला भेटतो, म्हणाला, 'धरम्याला भेटुन मला हेच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:50 PM2023-12-15T16:50:15+5:302023-12-15T16:50:30+5:30
धर्मेंद्र यांना 'हि मॅन', 'धरम', 'धरम पाजी' अशी अनेक नावं मिळाली. आपले कोल्हापुरकर त्यांना 'धरम्या' अशी हाक मारतात
बॉलिवूडमधील HE MAN म्हणजेच धर्मेंद्र देओल (Dharmendra) यांचे चाहते कोण नाहीत. ६० ते ८० च्या दशकातील अतिशय देखणे हिरो म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेले नाही. धर्मेंद्र यांना 'हि मॅन', 'धरम', 'धरम पाजी' अशी अनेक नावं मिळाली. आपले कोल्हापुरकर त्यांना 'धरम्या' अशी हाक मारतात हे नुकतंच समजलं. ते कसं? तर एका मराठी अभिनेत्याची नुकतीच धरम पाजींशी भेट झाली आणि त्याने केलेलं भेटीचं वर्णन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या सध्या गाजत असलेल्या मालिकेत अधिपतीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) यांनी नुकतंच धर्मेंद्र यांची त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर जाऊन भेट घेतली. लहानपणीच्या हिरोची भेट झाल्यावर त्यांना जो काही आनंद झालाय तो त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये वर्णन केला आहे.
ते लिहितात,
हे होणार होतंच..
ये तो होना ही था….
It was written in my destiny…
धरम्याला भेटुन मला हेच आणि असंच वाटणार होतं..
जन्नत कळणार होतीच मला.. स्वर्ग!!
शब्दशः स्वर्ग..
आयच्यान सांगतो, तो असाच प्रेमाने भेटेल, असाच मायेने पाठीवर हात फिरवेल असं त्याला न भेटताही वाटत होतं…
तो आहेच तसा… प्रेमळ, मायाळु, मनमोकळा, जिंदादील, दर्यादिल, जिंदगी से भरपूर…हे त्याला सिनेमात, टिव्हीत, सोशल मिडीयात बघुन, त्याच्या बद्दल ऐकुन पण कळत होतं…
तसंच झालं… अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळालं..भरुन पावलो मी…
तो धरम आहे… भारतीय चित्रपट सृष्टीतल्या सर्वात देखण्या, सर्वात हॅंडसम आणि भन्नाट अभिनेत्यांपैकी एक… आणि तो बेफाट माणुस आहे..एक गोष्ट त्याला इतर सुपरस्टार्सपेक्षा वेगळं बनवते..
त्याला आजही प्रत्येक माणसाशी आत्यंतीक प्रेमाने सेहनेवालीया धर्मेंद्र देओल म्हणुन कनेक्ट करता येतं.. त्याला प्रेम उत्तमरितीने रिसीव्ह करता येतं… ते दुप्पट करुन देता येतं..
हे वाटतं तितकं सोपं नाही.. अनेक स्टार्स, सुपरस्टार्स चाहत्यांच्या अपरंपार प्रेमाने भांबावतात, ओशाळतात, संकोचतात, कधी कधी तर तुसडे, श्रृढ होतात..धरम मात्र अशा प्रेमाने भारावतो, हळवा होतो.. हात पसरुन तो प्रेमाने भेटणाऱ्याला कवेत घेतो… हे दैवी आहे.. समोरच्याचं आयुष्य उजळुन निघतं यामुळे….
गेल्या चार वर्षांपासुन मनात होतं की धरम्याला भेटायला हवं.. काहीही करुन धरम भेटायलाच हवा..मी माफक प्रयत्न केले.. योग आला नाही…पण ईच्छा प्रबळ होती…
अचानक एकदा रात्री अजयचा फोन आला, “उद्या धरमला भेटायची शक्यताय.. काय करतोयस ?” अजयनं सगळी जादु घडवुन आणली….
ते “किसी चीज को शिद्दत से चाहो तो…” ते सगळं झालं….
आणि थेट धरमच्या त्या सुप्रसिध्द बंगल्यावर माझ्या आयुष्यातला हा सोनेरी योग आला…इतकं लिहुनही कळतंय शब्द तोकडे आहेत…
नशिब काढलं मी…माझ्यासारखे लाखोजण त्याच्याकडे अपार प्रेमाने, श्रध्देने, भारावुनच बघतील…. त्याने माझ्याकडे ईतक्या मायेने पहावं..
पाठीवरुन, डोक्यावरुन हात फिरवावा…
खरच नशिब.. दुसरं काय ?!!
आणखी एक.. त्याचा हात आजही ढाई किलोपेक्षा जास्त वजनाचा आहे… पंजा माझ्या दिडपट आहे… पण अत्यंत उबदार, मायाळु तळवे आहेत त्याचे… मैने हात चुम लिये उसके…
स्पर्श जाम ओळखीचा होता तो…
अजय, तहहयात तुझ्या कर्जात मी…
त्या सुचेता मॅमचं देव भलं करो…
तर दोस्तहो….जगात देव आहे…
जन्नत ईथेच आहे..जगात आपला यमला पगला दिवाना धरम आहे…. लहानपणापासुनच्या अनेक धरमवेड्या मित्रांची प्रकर्षाने आठवण आली.
स्वप्नील राजशेखर यांनी सोबतच भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचं धरम पाजींना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. स्वप्नील राजशेखर हे अभिनयाशिवाय लेखक, दिग्दर्शकही आहेत. 'कट्यार काळजात घुसली','बाईपण भारी देवा','टकाटक 2' या मराठी सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे.