“नोकरी देता का नोकरी म्हणत फिरायचो”, वैभव मांगलेंचा खुलासा, म्हणाले, “मी पाईप बनवण्याच्या कंपनीत...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:32 PM2023-08-12T18:32:01+5:302023-08-12T18:32:24+5:30
पाईप बनवण्याच्या कंपनीत वैभव मांगले करायचे नोकरी, खडतर प्रवासाबद्दल केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगलेंनी विविधांगी भूमिका साकारुन मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी चोख अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या वैभव मांगलेंसाठी अभिनय क्षेत्रात करिअर करणं सोपं नव्हतं. अभिनय क्षेत्रात येण्याआधीही त्यांनी करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना केला आहे.
वैभव मागलेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या स्ट्रगलबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले, “मला शालेय जीवनापासूनच कला क्षेत्रात रस होता. मला दहावीनंतर एम.ए. करायचं होतं. मला मराठीचा प्राध्यापक व्हायचं होतं. पण मध्यमवर्गीय घरातून असल्यामुळे मला सायन्सला जावं लागलं. त्यामुळे मी शेवटच्या वर्षात नापास झालो होतो. विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर मी बीएड आणि डीएड केलं आहे. मला जर शिक्षकाची नोकरी लागली असती, तर मी मुंबईत येण्याचा कधी विचारही केला नसता. मी मुंबईत आलो तेव्हा २७ वर्षांचा होतो.”
"अक्षय कुमारला कानाखाली मारा, १० लाख मिळवा”; कोणी अन् का दिली अशी ऑफर? जाणून घ्या
“२१व्या वर्षा मी पदवी घेतली. त्यानंतर चार वर्ष मी काहीच केलं नाही. रत्नागिरीत असताना मी एका कोकण कॅप्सूल नावाच्या कंपनीत सात-आठ महिने काम केलं. त्यानंतर सिमेंटचे पाईप बनवण्याच्या कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करायचो. तिथे काही महिने काम केलं. त्यानंतर मग माझ्याकडे काहीच काम नव्हतं. म्हणून मग वडिलांच्या सांगण्यावरुन मी डीएड केलं. पण, नेमकं तेव्हाच तंत्राटी म्हणून शिक्षक घेऊ लागले. तेव्हा माझ्या बरोबरीची मुलं कुठे ना कुठेतरी कामाला लागले होते. पण, मी नुसताच घरी बसून असायचो. मी उन्हातून नोकरी देता का नोकरी म्हणत फिरत राहायचो,” असं म्हणत वैभव मांगलेंनी कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं.
"विचारधारा जुळत नसली तरी पक्ष फोडून सत्तेत...", राजकारणावर वैभव मांगले स्पष्टच बोलले
वैभव मांगलेंनी नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘टाइमपास’, ‘अलबत्या गलबत्या’मधील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनयाबरोबरच ते त्यांच्या स्षष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सोशल मीडियावरुन समाजातील घडामोडींवर व्यक्त होताना दिसतात.