हे धक्कादायक आहे! विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामले हळहळले, म्हणाले- "तो आजारी होता पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 11:17 AM2024-08-10T11:17:48+5:302024-08-10T11:18:37+5:30
Vijay Kadam Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.
Marathi Actor Vijay Kadam Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. गेली कित्येक दशकं त्यांनी अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही वर्षांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. पण, अखेर आज सकाळी त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे.
"ही धक्कादायक बातमी आहे. तो आजारी होता. पण, इतक्या लवकर जाईल, असं वाटलं नव्हतं. अगदी काल परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो. १९८३ मध्ये टूरटूर नाटकात मी पहिल्यांदा काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्ड- विजय कदम ही जोडी सुपरहिट होती. या दोघांना बघतच आम्ही शिकलो आहोत. विजय कदम आऊटस्टँडिंग होते. त्याची रिअॅक्शनची स्टाइल छान होती. सहकलाकारांना तो चांगला सपोर्ट करणारा कलाकार होता. तो खूप लवकर गेला. हे फारच दु:खद आहे", असं म्हणत प्रशांत दामले यांनी विजय चव्हाण यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्याबरोबरची एक आठवणही त्यांनी सांगितली. "माझ्या पहिल्या सिनेमात मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं. नाटकात ज्याप्रकारे आपण रिअॅक्शन देतो. तशा सिनेमात द्यायच्या नसतात. हे त्यावेळी त्याने मला समजावून सांगितलं होतं. त्यामुळे शिकायची संधी आणि शिकवण्याची त्याची इच्छा हे फार महत्त्वाचं होतं", असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
विजय कदम हे गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात सक्रीय होते. नाटक, सिनेमे, जाहिराती अशा माध्यमांत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी क्रिकेटपटू रिषभ पंतसोबत एका जाहिरातीमध्ये काम केलं होतं. ही जाहिरात प्रचंड गाजली. विजय कदम यांनी १९८०-९० च्या काळात रंगभूमीवर केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे आणि टूरटूर या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या.