Bigg Boss फेम अभिनेत्रीसह मराठी कलाकारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:01 PM2023-03-28T13:01:37+5:302023-03-28T13:02:18+5:30
काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत शेलार याने उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबई - मागील वर्षी शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट पडल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. खरी शिवसेना कुणाची अशी लढाई दोन्ही गटात झाली. त्यात एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश करणाऱ्यांची नेते, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यात आता मराठी कलाकारांची भर पडली आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत शेलार याने उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्याच्याकडे चित्रपट आघाडीसह सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. सोमवारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दिग्गज मराठी कलाकारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात प्रामुख्याने बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, अभिनेते राजेश भोसले, अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री अलका परब, अभिनेते शेखर फडके, अभिनेते केतन क्षीरसागर यांचा समावेश आहे. वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर चित्रपट सेनेतही त्याचे पडसाद दिसून आले. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना चित्रपट सेनेची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्या खांद्यावर आहे. तर सुशांत शेलार याच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अभिनेता सुशांत शेलारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात त्यांना पाठिंबा दिला. आता शिंदेच्या शिवसेनेची चित्रपट आघाडी मजबूत करण्यासाठी शेलार प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, आमच्या क्षेत्रात कष्टकरी आहेत. अनेक कलाकार मदतीविना वंचित आहेत. त्यांना न्याय मिळावा, सरकारी मदत मिळावी ही समस्या आमच्यामार्फत सोडवण्याची संधी आम्हाला मिळाली त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला अशी भावना अभिनेते योगेश शिरसाट यांनी व्यक्त केली. तर चित्रपट सृष्टीतील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका एकटा निभावू शकत नाही. समस्या सोडवण्यासाठी आपल्यासोबत कलाकार, लेखक, दिग्दर्शक, गायक सर्वांना सोबत घेत प्रयत्न केले पाहिजे. आता ही सुरुवात आहे. चित्रपटसृष्टीतील समस्यांना वाचा फोडण्याचं काम होईल असं शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी म्हटलं.