अलका कुबल यांच्या लग्नाला होता आईचा विरोध; अखेर अशी बांधली समीरसोबत लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:53 AM2023-07-12T11:53:42+5:302023-07-12T11:54:06+5:30
Alka kubal: आईचा विरोध असतानाही अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्यासोबत लग्न केलं.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल (alka kubal). गेल्या कित्येक वर्षांपासून अलका कुबल मराठी सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. विशेष म्हणजे माहेरची साडी या सिनेमातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आदर्श, सोशिक सून अशी त्यांची प्रेक्षकांमध्ये इमेज तयार झाली. परंतु, खऱ्या आयुष्यात त्या प्रचंड धडाडीच्या , आत्मविश्वासू आणि कणखर आहेत. त्यांचा हा स्वभाव बऱ्याचदा त्यांच्या निर्णयांमधून दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी आईचा विरोध असतानाही समीर आठल्ये यांच्यासोबत कसं लग्न केलं हे सांगितलं.
अलका कुबल यांचा 'माहेरची साडी' हा सिनेमा तुफान गाजल्यानंतर अवघ्या सात ते आठ महिन्यांमध्येच त्यांनी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला आईचा चांगलाच विरोध होता. मात्र, तरीदेखील अलका यांनी समीरसोबत लग्न केलं.
"मी आणि समीरने बरेच सिनेमे एकत्र केले होते. मी पडद्यावर आणि तो पडद्यामागे असं सुरु होतं. खूप सिनेमा एकत्र केल्यानंतर मला तो आवडू लागला होता. त्यात आमचा मित्रमंडळींचा एक ग्रुपही होता. त्यामुळे एकत्र बाहेर फिरायला जाणं वगैरे सुरु होतो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो तरी समीरने मला काही प्रपोज केलं नव्हतं. शेवटी 'तू याच्यासोबत फिरतेस मग लग्नाचं कसं काय?' असं मला घरातून विचारलं जाऊ लागलं. त्यामुळे आपण लग्न कधी करायचं असं मी समीरला विचारलं. त्यानंतर मग समीरने त्याच्या घरी सांगितलं", असं अलका कुबल म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "दोघांच्या घरी सांगून झाल्यानंतर दोघांचे घरचे एकमेकांच्या कुटुंबियांना भेटले. पण, माझ्या आईचा लग्नाला थोडासा विरोध होता. मुळात, एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिचा नकार होता. पण, इंडस्ट्रीमध्ये काम करतोय त्यामुळे कोणाला कसं यश, अपयश मिळतं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. शेवटी दोघांचे घरातले भेटल्यानंतर झालेल्या चर्चेनंतर आई थोडीशीconvience झाली."
दरम्यान, समीर आठल्ये यांच्याशी लग्न केल्यानंतरही अलका कुबल यांचा फिल्मी प्रवास सुरु राहिला. यात समीर यांनी त्यांची खूप साथ दिली. अलका यांना दोन लेरी आहेत. या त्यांची एक लेक कमर्शिअल पायलट असून तिचं लग्न झालं आहे.