'खतरों के खिलाडी'मध्ये जाण्यासाठी अनुजा साठे तयार; पण ठेवली 'ही' अट
By शर्वरी जोशी | Updated: October 27, 2021 19:30 IST2021-10-27T19:30:00+5:302021-10-27T19:30:00+5:30
Anuja sathe: अलिकडेच अनुजाची मुख्य भूमिका असलेली 'एक थी बेगम' या सीरिजचा दुसरा सीजन प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये अनुजा अनेक साहसदृश्य करताना दिसत आहे.

'खतरों के खिलाडी'मध्ये जाण्यासाठी अनुजा साठे तयार; पण ठेवली 'ही' अट
कलर्सवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. आतापर्यंत या शोचे ११ पर्व पार पडले असून प्रत्येक पर्व चर्चेत राहिलेलं आहे. हा शो खासकरुन त्यात देण्यात येणारे टास्क आणि बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचं सूत्रसंचालन यामुळे चर्चेत असतो. या शोमध्ये कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी झळकले आहेत यात काही मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यामध्येच अभिनेत्री अनुजा साठेनेदेखील 'खतरों के खिलाडी'मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यापूर्वी मात्र तिने एक अट ठेवली आहे. या शोविषयी आणि अटीविषयी तिने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
अलिकडेच अनुजाची मुख्य भूमिका असलेली 'एक थी बेगम' या सीरिजचा दुसरा सीजन प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये अनुजा अनेक साहसदृश्य करताना दिसत आहे. त्यामुळे आता जर संधी मिळाली तर खतरों के खिलाडीमध्ये जाशील का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर एक अट ठेवत तिने हा शो करण्यासाठी संमती दर्शवली.
"हो. नक्कीच जर 'खतरों के खिलाडी'ची ऑफर आली तर मी नक्कीच जाईन. फक्त माझ्या अंगावर कोणी झुरळं टाकू नका. मला प्रचंड भीती वाटते. मी नक्कीच संपूर्ण ताकदीनिशी टास्क पूर्ण करेन. स्विमिंग असू दे किंवा इतर कोणतेही टास्क मी करेन. पण मला झुरळ नको. मला सापांची भीती वाटत नाही, पालीची पण भीती वाटत नाही. पण मला झुरळांचा फोबिया आहे. त्यामुळे जर त्यांनी माझ्यासाठी झुरळांची गोष्ट वगळली तर मी नक्कीच खतरों के खिलाडीमध्ये जाईन," असं अनुजा म्हणाली.
दरम्यान, सचिन दरेकर दिग्दर्शित 'एक थी बेगम' या सीरिजमध्ये अनुजा मुख्य भूमिकेत झळकली आहे. या सीरिजमध्ये तिने अश्रफ ही भूमिका साकारली आहे. कुख्यात डॉन दाउद इब्राहिमला जीवे मारण्याचा निश्चय करणाऱ्या सपनाचा म्हणजेच अश्रफचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.