'माझ्या मुलाचं बोलणं अचानक बंद झालं अन्...'; अश्विनी भावेंनी सांगितला धक्कादायक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:51 PM2023-05-04T19:51:04+5:302023-05-04T19:52:30+5:30
Ashwini Bhave: मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कसा फेल गेला हे सांगितलं.
मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे (Ashwini Bhave). आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. आजही अश्विनी यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. गेल्या काही काळात त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या चांगल्याच सक्रीय आहे.
सध्या सोशल मीडियावर अश्विनी भावे यांच्या एका मुलाखतीची चर्चा रंगली आहे. लोकमतच्या एका सदरात त्यांनी त्यांच्या मुलांच्या संगोपनाविषयी आणि जडणघडणीविषयी भाष्य केलं होतं. यात मुलांना मातृभाषेसह फॉरेन लँग्वेज शिकता यावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कसा फेल गेला हे सांगितलं.
एकेकाळी अश्विनी भावेंनी वापरल्यात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या साड्या; खुद्द स्वत: केला खुलासा
"समीर लहान असताना मी घरात मराठी बोलत असे. समीरच्या शाळेत इंग्रजी आणि माझी नॅनी समीरशी स्पॅनिश बोलत असे. मला वाटलं मी माझ्या मुलांच्या वाढीसाठी चांगले प्रयत्न करते आहे. तो मातृभाषाही शिकतोय आणि फॉरेन लँग्वेजही. पण अचानकच समीर खूप गप्प गप्प राहायला लागला आणि बोलायचाही बंद झाला. मी घाबरून डॉक्टरकडे गेले. ब-याच प्रश्नोत्तरानंतर त्यांनी सांगितलं की, तीन भाषांमध्ये त्याला फरक करता येत नाही आहे. तुम्ही पुढचं निदान वर्षभर तरी एकाच भाषेत त्याच्याशी बोला. इंग्रजीत बोललात तर जास्त बरं.. माझ्या मुलावर मराठीचे संस्कार करण्यात मी अपयशी झाले होते खरी; पण मी मराठीचा अट्टाहास सोडून दिला तात्पुरता. कारण ती त्याची गरज होती, असं अश्विनी भावे म्हणाल्या.
अभिनेत्यांना लाजवतील इतके हँडसम आहेत अश्विनी भावेंचे पती; पाहा फोटो
पुढे त्या म्हणतात, "आज माझा मुलगा स्पॅनिशही उत्तम बोलतो आणि मुंबईतल्या त्याच्या आजीशी मराठीत उत्तम गप्पाही मारतो. पालक म्हणून आपणच फक्त मुलांना शिकवत असतो, हे काही खरं नव्हे. खरं तर मुलंही आपल्याला शिकवत असतातच. त्यांच्याबरोबरच तर आपल्या आईपणाचं वय वाढत जात असतं ना!"
दरम्यान, अश्विनी यांनी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्न केलं असून सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत.