Bhagyaashreee Mote : “मी इतक्या लवकर नॉर्मल कशी झाले म्हणणाऱ्यांना...”, बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:59 PM2023-04-04T14:59:04+5:302023-04-04T15:00:32+5:30
Bhagyaashreee Mote : काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. आता भाग्यश्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल...
काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyaashreee Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. बहिणीच्या अकस्मात मृत्यूने भाग्यश्रीचं कुटुंब कोलमडून गेलं आहे. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. आता भाग्यश्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल...
भाग्यश्री लिहते...
मला कसं वाटतंय, हे सांगण्यासाठी मला सोशल मीडियाचा वापर करण्याची गरज नाही पण कधी कधी इथेही व्यक्त झालं पाहिजे. मी कधीच माझ्या अंर्तमनातील भावनांबद्दल बोललेली नाही पण आता...... आजकाल मला फक्त सुन्नपणा जाणवतो! आजूबाजूची ढोंगी माणसं मला अधिकाधिक एकटेपणाची जाणीव करून देतात.. नुकताच मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जोडीदार गमावला. ती माझं जग होती. तिच्या आणि माझ्या नात्याचं वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्दच माझ्याकडे नाहीत. ते नातं खूपच खास होतं. ती माझ्या अस्तित्वाचं कारण होती. माझी सपोर्ट सिस्टिम होती. अशी एकही गोष्ट नव्हती जी आम्ही एकत्र केली नाही. मी माझ्या कुटुंबात तिच्या सर्वात जास्त जवळ होते. इतर कोणीही तिची उणीव भरून काढू शकत नाही. ती आज माझ्या आयुष्यात नाही हा विचारच फार वेदनादायी आहे. ती सोडून गेली आणि दोन दिवस मी उठूच शकले नाही. मी फक्त आणि फक्त तिला मिस करत होते, रडत होते. डोळे मिटले की नुसता तिचा चेहरा दिसायचा. मी झोपूच शकले नाही.
माझे आयुष्य तिच्या आठवणींनी भरलेले आहे आणि आतापर्यंत तिच्या मृत्यूचे कारण आमच्याकडे नाही. आता आमच्यावर माझी भाची आणि भाच्याचीही जबाबदारी आहे. जे काही आहे, त्यासोबत आम्हाला आयुष्यात पुढे जायचं आहे. मी इतक्या लवकर नॉर्मल कशी झाले, असं म्हणणाऱ्यांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात काय सुरू आहे, याचा थोडादेखील अंदाज नाही. आता मला खूप काही करायचं आहे. बहिण गेल्याचं दु:ख बाजूला ठेऊन ती जाताना मागे सोडून गेलेल्या माझ्यासाठीच्या व्यावहारिक जबाबदाऱ्या मला पूर्ण करायच्या आहेत. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्यावर टीका करण्यापेक्षा हे सगळं समजून घ्याल. आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहाल....