'आई..माझे स्वप्न अधुरे राहिले,पण..'; कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचताच छाया कदम भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:01 AM2024-05-20T08:01:18+5:302024-05-20T08:02:12+5:30
Chhaya Kadam: 'फ्रँडी', 'सैराट' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारी छाया कदम यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.
सध्या कलाविश्वासह सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. १४ मे रोजी सुरु झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटी, मान्यवर व्यक्ती सहभागी होत आहेत. कान्समध्ये बऱ्याचदा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या हटके लूक आणि उपस्थितीमुळे चर्चेत असतात. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर असतात. मात्र, यावेळी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनी लाइमलाइट खेचून घेतलं आहे. जगभरातील अभिनेत्रींमध्ये छाया कदम यांनी त्यांच्या दमदार उपस्थितीमुळे सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये त्यांची एक पोस्ट चर्चेत येत आहे.
'फ्रँडी', 'सैराट' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारी छाया कदम यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यावेळी त्या एकट्या या सोहळ्यात सहभागी झाल्या नाहीत. तर, त्यांना या प्रवासात प्रेमाची, मायेची साथ मिळाली. त्या चक्क त्यांच्या आईची साडी नेसून कान्सच्या रेडकार्पेटवर गेल्या. याविषयी सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
"आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले....पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू", असं छाया कदम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी छाया कदम ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या. छाया कदम यांनी मराठीसह अनेक बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे. अलिकडेच त्या 'लापता लेडीज'मध्ये छाया कदम 'मंजू माई'च्या भूमिकेत झळकल्या. इतकंच नाही तर 'मडगाव एक्सप्रेस' या हिंदी सिनेमामध्येही त्यांन महत्त्वाची भूमिका साकारली होती.