गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा म्हणाली, 'लोकांची लायकी नाही..'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:11 PM2024-04-23T12:11:14+5:302024-04-23T12:11:52+5:30
Gautami deshpande: चिन्मय मांडलेकरने यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयावर आता गौतमीने तिचं मत मांडलं आहे.
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर (chinmay mandalekar) सध्या त्याच्या एका निर्णयामुळे चर्चेत येत आहे. सततच्या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे लोकांनी त्याला कमालीचं ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं ट्रोलिंग केल्यामुळे चिन्मयने यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे(gautami deshpande) हिने तिचं मत मांडलं आहे.
चिन्मयने अलिकडेच एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या मुलाचा जहांगीरचा उल्लेख केला होता. चिन्मयच्या मुलाचं नाव ऐकल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिचं मत मांडलं होतं. तसंच ट्रोलर्सला उत्तरं दिलं होतं. “भारत सोडून जायला आम्ही काही इंग्रज नाही”,असं म्हणत तिने ट्रोलर्सला सुनावलं होतं. तिच्या या व्हिडीओनंतर चिन्मयनेदेखील एक व्हिडीओ पोस्ट करत त्याच मत मांडलं.
चिन्मयने त्याच्या व्हिडीओमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नाही असा पवित्रा घेतला. त्याच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. अनेक कलाकार मंडळींनी त्याला पाठिंबा दिला आहे. यात गौतमीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत चिन्मयला पाठिंबा दिला आहे. तसंच ट्रोलर्सलाही सुनावलं आहे.
काय म्हणाली गौतमी?
“कलाकारांना अशा प्रकारची वागणूक देतात का?, असे सॉफ्ट टार्गेट बनवायचे असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगलं मिळवण्याची. हे पाहून अतिशय वाईट आणि निराशाजनक वाटलं. हे असं व्हायला नको होतं. चिन्मय दादा तुला आमचा कायमच पाठिंबा आहे”, असं गौतमीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे चिन्मयचा निर्णय?
“महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करु इच्छितो की, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, असं म्हणत चिन्मयने त्याचा निर्णय सांगितला.
दरम्यान, गौतमी सध्या चिन्मयच्या गालिब या नाटकात काम करतांना दिसत आहे. गालिब या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे.