"आयुष्यात असे वाईट दिवस पाहिले नव्हते...", मराठी अभिनेत्रीचं मानसिक आरोग्याविषयी भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:44 IST2025-03-24T17:40:45+5:302025-03-24T17:44:35+5:30
मीरा जगन्नाथ ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

"आयुष्यात असे वाईट दिवस पाहिले नव्हते...", मराठी अभिनेत्रीचं मानसिक आरोग्याविषयी भाष्य
Mira Jagannath: मीरा जगन्नाथ (Mira Jagannath)ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'ठरलं तर मग', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. अलिकडेच मीरा इलू इलू १९९८ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा झाली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री मानसिक स्वास्थाविषयी भाष्य केलं आहे.
नुकतीच मीरा जगन्नाथने 'राजश्री मराठी' ला खास मुलाखत दिली. त्यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं, तेव्हा मीरा म्हणाली, "गेली दोन वर्ष माझे इतके रडण्यात, डिप्रेन या सगळ्या गोष्टींमध्ये गेले. मी कधीच कोणाला याबद्दल बोलले नाही, कारण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा त्रास असतो. एकतर मी कधीच कोणाला काही सांगत नाही मला ते सिम्पथी वगैरे हा प्रकार नाही आवडत. शिवाय घरच्यांना सांगितलं तर ते टेन्शन घेणार. मग मी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊ लागले. कुठेतरी आपल्याला हे सगळं आपल्या डोक्यातून बाहेर काढावं लागेल. असंच राहून तुम्ही काहीच करत नाही, चार-चार दिवस बेडवर पडलात ,टीव्ही बघताय, तिथेच पडून खाताय सगळं टाकताय. त्यामुळे मलाच स्वत: ची लाज वाटू लागली की मी हे चुकीचं करते आहे."
लोकांनी नावं ठेवली
"ज्या दिवशी मी ठरवलं त्या दिवशी मी उठले आयुष्यात कितीही अडचणी तरी आता हे आपल्याला नाही करायचं, असं म्हटलं. त्याच्यानंतर हळूहळू कामं येऊ लागली. पण ते दोन वर्ष खूप वाईट होते. मी आयुष्यात असे वाईट दिवस पाहिले नव्हते. जेव्हा लोक तुमच्याबद्दल बोलतात ना तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि ते माझ्याबद्दल बोलणं चालू झालं होतं."
त्यानंतर मीराने सांगितलं, "एकतर माझे कोणी मित्र नाहीत मी कोणाबरोबर फिरायला जात नाही. पण तरीही तुमच्याबद्दल वाटेल ते बोलतात. पण का ? त्यामुळे म्हटलं की मला कोणाच्या सोबतीची गरज नाही. मी माझं काम करेन मस्त एकटीने जाईन आणि मज्जा करेन. मी सोशल मीडियावर स्टोरी टाकायची की मेंटल हेल्थ किती गरजेची आहे. तर त्याच्यावरती माझ्याच जवळचे काही लोक म्हणायचे अरे कशाला टाकतेस लोकांना असं वाटेल की तुला मानसोपचार तज्ज्ञांची तुला का गरज पडली. माझं येवढंच म्हणणं आहे की सर्दी-खोकला झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता ना? मग याने काय फरक पडतो."