मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 09:56 AM2024-11-18T09:56:17+5:302024-11-18T10:00:29+5:30
काही महिन्यांपूर्वी भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने ठाण्यामध्ये पती नीरज मोरेसोबत आलिशान रेस्टॉरंट उघडलंय
अभिनेत्री मृणाल दुसानिस काही महिन्यांपूर्वी भारतात परतली. मृणालने लग्नानंतर काही वर्ष अमेरिकेत वास्तव्य केलं. त्यानंतर मृणालने मनोरंजन क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मृणाल काही महिन्यांपूर्वी पती आणि मुलीसोबत पुन्हा भारतात आली. भारतात येताच मृणाल पुन्हा एकदा मालिकेत कधी दिसणार याचीही सर्वांना उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी मृणालच्या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि मृणालच्या चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण झाली. आता मृणालने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिलीय. मृणालने पतीसोबत ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलंय.
मृणाल - नीरजने उघडलं स्वतःचं रेस्टॉरंट
मृणाल-नीरजने काल सर्वांना आनंदाची बातमी दिलीय. मृणाल आणि नीरज या दोघांनी ठाण्यात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलंय. Belly Laughs असं या रेस्टॉरंटचं नाव असून कॉकटेल्स, मॉकटेल्स आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद लोकांना घेता येईल. ठाण्यातील हिरानंदानी भागात मृणालने हे रेस्टॉरंट उघडलंय. काल पहिल्याच दिवशी लाईव्ह संगीत आणि मराठी कलाकारांच्या उपस्थितीत या रेस्टॉरंटचं उद्धाटन करण्यात आलं. ज्ञानदा रामतीर्थकर, राजश्री निकम, वंदना गुप्ते या अभिनेत्रींनी रेस्टॉरंटच्या उद्धाटनाला हजेरी लावली.
मृणालच्या नव्या मालिकेची उत्सुकता
मृणालने भारतात परतल्यावर स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत काम करायला सुरुवातही केलीय. 'लग्नानंतर होईलच प्रेम' असं या मालिकेचं नाव असून या मालिकेत मृणालसोबत अभिनेता विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे हे कलाकार झळकणार आहेत. १६ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल. मृणालच्या चाहत्यांना पुन्हा एकदा तिला मालिकेत बघण्यासाठी उत्सुकता आहे.