RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 01:33 PM2023-10-25T13:33:13+5:302023-10-25T13:40:10+5:30
प्राजक्ता माळीने काल विजयादशमीनिमित्त नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) काल विजयादशमीनिमित्त नागपूरलाराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी व्यासपीठावर प्राजक्ता माळी सर्व मान्यवरांसोबत पहिल्या रांगेत होती. RSS चे संचलन बघितलं, नंतर तिने संघाची प्रार्थनाही म्हटली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. तर नुकतंच प्राजक्ताने नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमानंतर प्राजक्ताने नितीन गडकरींसोबतच्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. या भेटीत तिने अनेक गोष्टींवर चर्चा केली. तिने लिहिले, 'मी आणि केंद्रिय मंत्री नितीनजी नागपूरात एका कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिला.
आयोजकांना म्हटलं, सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल. आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला. नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यामुळे सबंध परिवारालाही भेटता आलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला..
निघताना त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं, त्यांच्या कामावर लिहीली गेलेली ८-९ पुस्तकं दिली, नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिली. (जी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसली. )
आयुष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार.'
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तिने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगनाही आहे. 'रानबाजार' या वेब सीरिजमध्येही प्राजक्ता झळकली होती.