"आजही लोकांना मत मांडणारी मुलगी आवडत नाही" ऋतुजा बागवेने सांगितली खटकणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:56 PM2023-12-08T16:56:37+5:302023-12-08T16:57:05+5:30

'एक स्त्री म्हणून तुला आजही कोणत्या गोष्टी खटकतात?' ऋतुजाने दिलं सडेतोड उत्तर

Marathi actress Rutuja Bagwe shares what is the thing she dosent like about people | "आजही लोकांना मत मांडणारी मुलगी आवडत नाही" ऋतुजा बागवेने सांगितली खटकणारी गोष्ट

"आजही लोकांना मत मांडणारी मुलगी आवडत नाही" ऋतुजा बागवेने सांगितली खटकणारी गोष्ट

'नांदा सौख्यभरे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे आगामी सिनेमा 'सोंग्या' मध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे. ऋतुजाने मालिकेनंतर 'अनन्या' नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तर आता ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तिने लोकमत फिल्मीला दिलखुलास मुलाखत दिली.

ऋतुजा बागवे सध्या 'सोंग्या' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की 'एक स्त्री म्हणून तुला आजही कोणत्या गोष्टी खटकतात?' यावर ती म्हणाली, 'मला असं वाटतं की आजही लोकांना मत मांडणारी मुलगी आवडत नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की ही अति बोलतेय. किंवा हिला मत असून शकतं. ही का मांडतेय. मी म्हणते तिचं मत चुकीचं असेल किंवा बरोबरही असेल पण तिला मतच असू नये हे जे काही लोकांचं म्हणणं असतं ना ते मला खटकतं.'

ती पुढे म्हणाली,'आज आपण इतक्या स्वतंत्र आहोत इतक्या शिकलेल्या आहोत, आपल्याला आपलं मत मांडण्याची मुभा असली पाहिजे. तडजोड तर आपण सगळ्याच करत असतो. पण अन्याय सहन करणंही तितकाच मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तडजोड आणि अन्याय सोसणं यातली जी बारीक रेष आहे ती आपल्याला प्रत्येकाला माहित असते तर आपण योग्यवेळी त्यावर आवाज उठवलाच पाहिजे. कधीकधी तुमच्या मतांना तितका आदर दिला जात नाही का तर तुम्ही मुली आहात म्हणून. पण आजकाल आपल्या पिढीतले मुलं खूपच कमाल आहेत. त्यांना चूलमूल सांभाळणाऱ्यांपेक्षा अशा मुली आवडतात ज्यांना आपलं मत आहे ज्या स्वतंत्र आहेत.'

'सोंग्या' चित्रपटाबद्दल...

महाराष्ट्रात आजही अनेक कुप्रथा आहेत, ज्या स्त्रियांवर अन्याय करतात. ज्यात अनेकांच्या आयुष्याची, स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी होते. या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणारा मराठी चित्रपट 'सोंग्या' येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात  समाजातील अन्यायविरुद्ध ठामपणे उभ्या राहणाऱ्या एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साकारली आहे. ऋतुजा बागवेशिवाय या चित्रपटात अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत.

Web Title: Marathi actress Rutuja Bagwe shares what is the thing she dosent like about people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.