जाडेपणावर ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरने चांगलंच सुनावलं! म्हणाली, "मी लठ्ठ झाले म्हणून तुम्ही.."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 10:36 AM2024-03-31T10:36:49+5:302024-03-31T10:37:13+5:30
गरोदरपणानंतर सातत्याने वाढलेल्या वजनावर ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूरने चांगलंच सुनावलं आहे. काय म्हणाली सई? महिला आणि पुरुष दोघांसाठी महत्वाचं
काहीच दिवसांपुर्वी सई लोकूरने मुलीला जन्म देऊन ती आई झाली. सई आणि तिचा नवरा तीर्थदीप रॉय दोघेही सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. सईला गेल्या अनेक दिवसांपासून प्रसुतीनंतर वाढलेल्या शरीराबद्दल लोकं ट्रोल करत आहेत. अनेकजण सईच्या लठ्ठपणाकडे बोट दाखवत आहेत. अखेर सातत्याने येत असणाऱ्या कमेंट्सना वैतागून सईने ट्रोलर्सना सणसणीत चपराक दिली आहे.
सई म्हणाली, "लोकांना जाड आणि बारीक याच्यापलीकडे काही दिसत नाही का? महिलांना साधारणपणे 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळते. स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी हे सहा महिने महिलांसाठी महत्वाचे असतात. मी तीनच महिन्यांनी काम सुरु केलं. मी अनेक ब्रँडसोबत पार्टनरशीप शूट करत आहे. वेळात वेळ काढून मी कंटेंट बनवत असून अनेक उत्पादनांची जाहिरात करत आहे."
सई पुढे लिहीते, "एका नव्या आईचे हे प्रयत्न न बघता अनेकजण फक्त माझ्या वाढलेल्या शरीराकडे बघत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजात राहत आहोत? एकमेकांना प्रोत्साहन देण्याऐवजी एकमेकांना खाली खेचण्याचे प्रयत्न आपण करत आहोत." अशी संतापजनक पोस्ट सईने लिहिली. सईच्या या पोस्टवर अनेकांनी तिला सपोर्ट केला आहे.