"किरणला ४ वेळा वॉर्निंग दिलेली", सविता मालपेकर यांनी सांगितली Inside Story, म्हणाल्या- "त्याला राजकारण्यांपर्यंत जायची..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:12 PM2024-11-13T15:12:55+5:302024-11-13T15:15:01+5:30
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं? किरण मानेंना या मालिकेतून का काढलं? याबाबतही भाष्य केलं.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अनेक सिनेमा, मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेली कित्येक दशकं त्या सिनेसृष्टीत काम करत आहेत. सविता मालपेकर यांनी नुकतीच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. अभिनय कारकीर्दीतील अनेक किस्से सांगत सविता मालपेकर यांनी या मुलाखतीला रंगत आणली. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं? किरण मानेंना या मालिकेतून का काढलं? याबाबतही भाष्य केलं.
'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण मानेंना काढून टाकण्याबाबत सविता मालपेकर यांनी स्पष्ट शब्दांत त्यांची भूमिका मांडली. "किरण छान मुलगा आहे. पण, कधी कधी चांगली असणारी माणसं अशी का वागतात, हे मला कळत नाही. काही गोष्टी माणूस प्रत्यक्षात बोलत नाही. पण, कृतीतून आणि बॉडी लँग्वेजमधून त्या गोष्टी दिसतात. त्यामुळे त्याचा जास्त त्रास होतो. लक्ष्मी वर्सेस सरस्वती मालिकेतही किरणने माझ्या मुलाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या वेळेस मी त्याला म्हणाले होते की किरण्या आपल्याला चांगलं काम करायचं आहे. चांगली भूमिका मिळालीये, तर व्यवस्थित काम कर", असं त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, "मी कोणत्याही मालिकेत काम करताना निर्माते आणि कलाकारांशी बोलते. चुका सगळ्यांकडून होतात. पण, त्या मान्य करण्याची आणि माफी मागण्याची तयारी असली पाहिजे. ज्या सेटवर आपले वादविवाद होतात...ते सेटच्या गेटबाहेर जाता कामा नयेत. गैरसमज झाले तर समोरच्या व्यक्तीला विचारण्याची हिंमत पाहिजे. त्यामुळे गोष्टी क्लिअर होतात. आपल्याला एकत्र काम करायचं असतं. त्यामुळे हेवेदावे करून किंवा तोंड वाकडं करून उपयोग नाही. छान आनंदात आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. एकतर त्या मालिकेत मी सगळ्यात मोठी होते. दुसरी गोष्ट म्हणजे एका कोणामुळे माझे १०० लोक उपाशी मरता कामा नये. किरणला न सांगता काढलेलं नाही. चॅनेलने त्याला चार वेळा वॉर्निंग दिली होती. त्याला नेमकं कोणत्या कारणासाठी काढलं ते कारण मला आजही माहीत नाही. माझं तेव्हा दुसरं शूटिंग सुरू होतं. तेव्हा मला कळलं की किरण मानेला मालिकेतून काढलं. मालिकेच्या शूटिंगदरम्यान मीटिंगमध्ये किरणने माफीही मागितली होती. आणि त्यांचं आपापसातलं मिटलंही होतं. त्यामुळे नंतर त्याला का काढलं? हे मलाही माहीत नाही."
"किरण चुकला असं मला वाटतं, हे त्याला मान्य आहे की नाही हे मला माहीत नाही. पण, राजकारणी लोकांपर्यंत घेऊ जाण्याइतपत काहीही झालेलं नव्हतं. किरण इथे चुकला. बरं हे किरणचं स्वत:चं डोकं नव्हतं. किरणच्या पाठीमागे एक शक्ती होती आणि त्यामुळे तो हे सगळं करत होता, असं माझं ठाम मत आहे. किरणने हे करू नये, असं मला वाटत होतं. आपण चुकत असताना माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. नाहीतर वाद जास्त वाढतात. सेटवरही किरण जाता येता टोमणे मारायचा. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. त्यामुळे बाकीच्यांचंही निश्चितच काहीतरी चुकलं असेल. पण, किरणने कुठेतरी हे थांबवावं असं मला वाटत होतं. कारण, यामुळे सगळ्यांचं नुकसान होणार होतं. त्यामुळे मला बोलावं लागलं. आणि म्हणूनच किरणला वाईट वाटलं. वाद हा तेवढ्यापुरता असला पाहिजे. एकदा किरण दिग्दर्शकाच्या अंगावर गेला होता, जे चुकीचं होतं", असंही सविता मालपेकर यांनी सांगितलं.