'सूर्यवंशी'मध्ये झळकलीये 'ही' मराठमोळी अभिनेत्री; सांगितला ऑडिशनचा किस्सा
By शर्वरी जोशी | Published: December 10, 2021 07:50 PM2021-12-10T19:50:00+5:302021-12-10T19:50:00+5:30
Sooryavanshi : या चित्रपटात दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट झळकली आहे. मात्र, या सगळ्या कलाकारांच्या गर्दीत एक मराठमोळा चेहरा प्रेक्षकांचं वेधून घेत आहे.
काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी (rohit shetty) याचा सूर्यवंशी (sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमार (akshay kumar) ,कतरिना कैफ (katrina kaif), अजय देवगण (ajay devgn) आणि रणवीर सिंग (ranveer singh) अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. या प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, या सगळ्यांच्या गर्दीत एक चेहरा प्रेक्षकांचं वेधून घेत आहे. तो चेहरा म्हणजे मराठमोळी अभिनेत्री शर्वरी लोहकरे. सूर्यवंशी या चित्रपटात शर्वरीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून या चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली हे तिने सांगितलं आहे. अलिकडेच तिने 'लोकमत ऑनलाइन'ला विशेष मुलाखत दिली आहे.
"खरं तर मी एका वेगळ्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला गेले होते. माझी ऑडिशनची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली. त्यानंतर काही दिवसांनी मला चित्रपटाच्या टीमकडून फोन आला. आणि, एका वेगळ्या भूमिकेसाठीच ऑफर दिली. मुळात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोन दिग्गजांसोबत काम करायला मिळणं ही एक मोठी संधी होती. तसंच एक कलाकार म्हणून मला जे अपेक्षित होतं ते मला मिळालं. थोडक्यात सांगायचं झालं तर या चित्रपटात मी साकारलेल्या भूमिकेला असलेलं वजन दिसून येतं, असं शर्वरी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मुळात हा माझा पहिलाच हिंदी चित्रपट होता आणि तो देखील इतक्या दिग्गज कलाकारांसोबत त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खास होता. तसंच मी साकारलेल्या भूमिकेला किती वजन आहे. ती भूमिका प्रेक्षकांसोबत कशी जोडली गेली आहे हे मी स्वत: चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिलं आहे."
दरम्यान, शर्वरीने या चित्रपटात एका एटीएस ऑफिसरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचं नाव वंदना तांबे असं असून ही भूमिका चित्रपटात महत्त्वपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं. कतरिना आणि अक्षयच्या नात्यात सुरु असलेल्या चढउतारांमध्ये वंदनाने दिलेला सल्ला या दोघांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो आणि त्यांच्या नात्याला नवीन वळण मिळाल्याचं पाहायला मिळत.