पती मोहन यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:41 AM2024-11-07T10:41:14+5:302024-11-07T10:41:41+5:30

मोहन गोखले यांच्या वाढदिवशी शुभांगी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Marathi Actress Shubhangi Gokhale Remembers Memories Of Her Late Husband Mohan Gokhale | पती मोहन यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

पती मोहन यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

 Shubhangi Gokhale Remembers Mohan Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे पती व दिग्गज अभिनेते मोहन गोखले आज आपल्यात नाहीत. पती मोहन गोखले यांच्याबद्दल बोलताना शुभांगी नेहमीच भावुक होतात. मोहन गोखले यांनी फार कमी वयात जगाचा निरोप घेतला होता. शुभांगी गोखले वेळोवेळी त्यांची आठवण काढताना दिसून येतात. आता मोहन गोखले यांच्या वाढदिवशी शुभांगी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

शुभांगी यांनी पती मोहन गोखलेंचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी उषा नाईक, नीनाताई कुळकर्णी, अमिता खोपकर यांनी मोहन यांच्याबद्दल सांगितेल्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहलं, "तारीख, महिना, वर्षं या सगळ्या भूतलावरच्या गोष्टी ७ नोव्हेंबर... मोहनचा वाढदिवस… त्याच्या आत्ताच्या दूरच्या गावी नोव्हेंबरची ७ तारीखबिरीख नसेलही…. पण एक चक्कर मारून गेला बहुधा! कारण नोव्हेंबरमध्ये मी एक टेलिफिल्म केली, सध्या एका आगामी प्रोजेक्टवर काम चालू आहे. गाठीभेटी इ. टेलिफिल्ममध्ये उषाताई होत्या.. उषा नाईक. मोहनच्या पहिल्या पिक्चरची हिरॉईन बन्याबापू! सुपरहिट सिनेमा.. गाणी त्याहून सुपरहिट!"

त्या लिहतात, "खूप गप्पा,आठवणी... उषाताईंनी सांगीतलं त्या पिक्चरच्या शूटींगचा पहिला दिवस. कोल्हापुरातला स्टुडिओ. दोन जोड्या होत्या.एक मेकपरूम हिरॉईन्सची एक मेकपरूम हिरोंची. बाळकाका( कर्वे) आणि मोहनराव( गोखले) स्टुडिओचा फेरफटका मारत होते... त्यांना झाडाखाली आपलं सामान घेऊन मुसमुसत बसलेल्या उषाताई दिसल्या... त्यांना दुसऱ्या हिरॉईननी मेकपरूम मधून बाहेर काढलं होतं.  "कालची पोरगी माझ्या रूममध्ये? चालणार नाही" असं म्हणून. उषाताई म्हणाल्या "मोहननी त्याक्षणी माझी bag उचलून त्यांच्या रूममध्ये नेलं.. तू इथे कर तुझा मेकप वगैरे... तुला costume change असेल तेंव्हा आम्ही जाऊ बाहेर" ते पिक्चर पूर्ण होईपर्यंत मला त्यांची रूम दिली बघ. गेला आठवडाभर एका कामाची पूर्वतयारी चालू आहे. नीनाताई (कुळकर्णी)बरोबर! 'सावित्री' नाटकाच्या आठवणी निघाल्या... मोहनचं काम.. इतर काम याबद्दल फार प्रेमानी बोलत होती नीना ताई".


 शुभांगी यांनी पुढे लिहलं, "एक आठवण मला त्यात काम केलेल्या अमिता खोपकरनी सांगीतली.. तेव्हाचे दौरे मोठे आणि बाकीच्या सोयी म्हणजे नावालाच सोयी.. गावातलं सगळ्यात कळकट, गैरसोयींचं लॉज असायचं...अशाच एका दौऱ्यात कुठल्यातरी आडगांवात ही मंडळी पहाटे लॉजला पोहचली...कधीही कोसळून पडेल असं ते लॉज होतं अर्धवट झोपेत,  मॅनेजरने नेमून दिलेल्या रूमच्या किल्ल्या घेण्यासाठी ताटकळलेले सगळे.. मोहन एक किल्ली उचलून भराभर जिना चढून गेला आणि वरून जोरात वेटरला हाका मारून म्हणे 'अरे इथला AC आणि TV चा रिमोट दे बघू, कार्पेट ओलं झालंय ते बदल जरा'... बायकांमध्ये जो काही खडबडाट झाल.  त्याला सुपर डीलक्स दिलीय... खूप गदारोळ झाला... मॅनेजर एकीकडे त्यांना शांत करत होता न् मोठ्यानी वरच्या मजल्यावरच्या मोहनला  गप ना मोहन्या, xxxxxx! ओरडत होता!!! त्या लॉजला धड दारही नव्हतं... तिथे हे सगळं का असेल असा छळायचा मोहन... तर आपण काही करायचं नाही. आठवणी आपोआप तरंगत आसपास येतातच!!!".

शुभांगी आणि मोहन गोखले हे एकत्र काम करता करता पडले आणि नंतर त्यांनी लग्न केलं. 27 जुलै 1993 रोजी त्यांच्या एकुलत्या एक कन्येचा अर्थात  सखीचा जन्म झाला. 9 एप्रिल 1999 रोजी चेन्नई येथे 'हे राम' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मोहन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या निधनानंतर स्वत:ला सावरत शुभांगी गोखले यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस, हम है ना, डॅडी समझा करो, लापतागंज, राजा राणीची गं जोडी, झेंडा, क्षणभर विश्रांती , बोक्या सातबंडे अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला. 
 

Web Title: Marathi Actress Shubhangi Gokhale Remembers Memories Of Her Late Husband Mohan Gokhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.