इंडस्ट्रीत माणूसकी शिल्लक आहे का? तेजश्री प्रधानने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, 'आई गेली तेव्हा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:45 PM2024-01-13T12:45:14+5:302024-01-13T12:45:49+5:30
काही दिवसांपूर्वीच तेजश्रीच्या आईचं निधन झालं.
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिचे विचार ऐकायला सर्वांनाच आवडतात. ती ज्याप्रकारे आयुष्याकडे पाहते ते चाहत्यांना खूपच भावतं. तेजश्रीची विचार सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. दोन वर्षांनी तेजश्री पुन्हा मालिकेतून प्रेक्षकांना भेटत आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत ती मुक्ता हे पात्र साकारत आहे. तर दुसरीकडे तेजश्रीसाठी गेले काही महिने खूपच कठीण होते. तिच्या आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. सोबतच मालिकेचं शूटिंग आणि सिनेमाच्या चित्रीकरणातही ती व्यस्त होती. तेव्हा इंडस्ट्रीतून तिला कसा सपोर्ट मिळाला याविषयी ती स्पष्ट बोलली आहे.
'मिरची मराठीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजश्री म्हणाली, "माझी आई आताच गेली. तर दुसरीकडे मालिकेत माझा लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. त्यामुळे काही दिवस चांगले आहेत तर काही दिवस वाईट आहेत. त्यामुळे येणारा दिवस मी येतोय तसा जगत आहे. हा महिना माझ्यासाठी खूप कठीण होता.पण मला माझ्या सहकलाकारांची खूप मदत होते. सगळेच खूप छान आहेत. मालिकेत माझ्या आईची भूमिका शुभांगी गोखले साकारत आहे. ती प्रचंड सपोर्टिव्ह आहे. आमचे आई मुलीचे खूप सीन होत असतात. सगळ्यांचीच मला खूप मदत होते. इतकंच नाही तर मी सिनेमाचं शूटही करत होते. त्यातील सहकलाकारांनीही मला खूप साथ दिली. मी सगळीकडे प्रमोशनला जाऊ शकत नव्हते. पण त्यांनी समजून घेतलं."
ती पुढे म्हणाली,"आपण इतकी वर्ष आज काम करतोय त्यामुळे हे पाहून खूप बरं वाटतं. ही इंडस्ट्री काय आहे सब झूठ की दुनिया असं आपण म्हणत असतो. पण मी अभिमानाने सांगू शकते की नाही इंडस्ट्रीत माणूसकी आहे. ती कुठेतरी कॅमेऱ्यातही दिसत असते काम करताना डोकावत असते. या महिन्यात तर मी ते खूप अनुभवलं आहे."
तेजश्री प्रधान आगामी 'लोकशाही' सिनेमात झळकणार आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले यांच्याही भूमिका आहेत. शिवाय तिची स्टार प्रवाहवर 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सुरुच आहे.