"तू आहेस म्हणून आम्ही..."; 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'निमित्त अभिनेत्री विशाखा सुभेदारची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 05:47 PM2024-11-21T17:47:55+5:302024-11-21T17:53:46+5:30
विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
Vishakha Subhedar: विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'फू बाई फू' तसेच 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिकेत रागिणी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अशातच आज 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'च्या निमित्ताने विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनोख्या पद्धतीने टेलिव्हिजनचे आभार मानले आहेत. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर 'वर्ल्ड टेलिव्हिजन डे'निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, "तू मला सगळं काही दिलंस..! ओळख, नाव, पैसे, प्रसिद्धी, आणि वेगवेगळ्या भूमिका. तुझ्याबरोबरचा प्रवास हा कायमच मी ‘मला’ शोधण्यात घालवते. फक्त ‘नजरेने’ काय करता येईल..? वाक्य कशी फेकावी म्हणजे तुझ्या समोर बसलेला प्रेक्षक ‘वाह’ म्हणेल. हा खेळ आम्हा कलाकारांचा कायमच सुरु असतो. तुझी मेमरी म्हणे शॉर्ट टर्म असते पण खरं सांगू, मी तुझ्या साक्षीने अनेक वर्षांपूर्वी मारलेली 'cartwheel' अजून लोकांच्या ध्यानात आहे. माझ्याकडून साकारल्या गेलेल्या 'फु बाई फु' आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील विविध व्यक्ती रेखा, 'शेजारी शेजारी' मधील 'लज्जो', 'आंबट गोड' मधली 'दया' असो किंवा 'का रे दुरावा' मधली 'नंदिनी' असो अजून अनेकांच्या स्मरणात आहे आणि आता 'शुभविवाह' मधली 'रागिणी' किती खेळ खेळले आहेत आणि आजही खेळतेय मी तुझ्या साक्षीने!"
पुढे अभिनेत्रीने लिहलंय, "Tv बाबा, तू आहेस म्हणून आम्ही आहोत. आमच्या असण्याला, जगण्याला तूझा आधार आहे. आजवर ह्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला हा प्रवास साधण्याची संधी दिली त्या त्या सगळ्यां निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, सहप्रवश्यांना मनापासून खुप खुप धन्यवाद..! आणि तुझ्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि यापुढेही तसच राहील, जागतिक दूरचित्रवाणी दिवसाच्या म्हणजेच वर्ल्ड टेलिव्हिजन डे च्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा!" अशा भावना विशाखाने या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.