बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मराठीचे आकर्षण

By Admin | Published: September 20, 2015 12:23 AM2015-09-20T00:23:09+5:302015-09-20T00:23:09+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी मराठीत आणि मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्याची परंपरा तशी फारशी नवीन नाही. अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी

Marathi actresses are also attracted to Marathi | बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मराठीचे आकर्षण

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही मराठीचे आकर्षण

googlenewsNext

बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी मराठीत आणि मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्याची परंपरा तशी फारशी नवीन नाही. अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवितानाच मराठी चित्रपटांत काम केले आहे. तर, काही मराठी नसलेल्या अभिनेत्रींनाही मराठी रुपेरी पडद्याने आकर्षित केले आहे.
अगदी काही काळ मागे गेलो, तर असे अनेक चित्रपट पाहायला मिळतील, ज्यांमध्ये बॉलिवूडच्या हीरोईनच्या अभिनयाची जादू मराठीमध्ये अनुभवायला मिळाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री संध्या. ‘नवरंग’, ‘जलबिन मछली, नृत्यबिन बिजली’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनय आणि नृत्यकला दाखविणाऱ्या संध्या यांनी ‘पिंजरा’ या एकाच मराठी चित्रपटात भूमिका केली.
व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड बनला. उषा किरण यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत चांगले नाव मिळविले. ‘नजराना’, ‘दाग’, ‘बागबान’, ‘काबुलीवाला’ यांसारख्या हिंदी चित्रपटांत झळकलेल्या उषा किरण यांनी ‘शिकलेली बायको’, ‘जशास तसे’, ‘दूध-भाकर’ या चित्रपटांना वेगळी उंची प्राप्त करून दिली. हिंदीतील गाजलेली ‘मॉँ’ सुलोचना या मराठी अभिनेत्री. त्यांनी ‘अब दिल्ली दूर नहीं’ या हिंदी चित्रपटातून आपली कारकिर्द सुरू केली. मात्र, त्यानंतर ‘सांगत्ये ऐका’, ‘वहिनीच्या बांगड्या’ यासारख्या २५०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अभिनेत्री तनुजा हिने ‘झाकोळ’मध्ये मराठीत प्रथम पाऊल टाकल्यानंतर बऱ्याच वर्षांनी ‘पितृऋण’मध्ये त्यांचे दर्शन घडले. नूतन यांनीही ‘जिद्द’ आणि ‘पारध’मध्ये अप्रतिम अभिनय केला होता. ‘पिया तू अब तो आजा’ म्हणत नृत्याची छाप रसिकांवर सोडणाऱ्या हेलन यांनीही ‘शांतता खून झाला आहे’मध्ये क्लब डान्समधून रसिकांना मोहित केले होते. ‘वन रूम किचन’मध्येदेखील एका छोट्याशा भूमिकेमध्ये त्या झळकल्या होत्या. याशिवाय, ऊर्मिला मातोंडकरने खूप वर्षांनी ‘हृदयनाथ’ आणि ‘आजोबा’मध्ये भूमिका करून रसिकांना सुखद धक्का दिला. ‘अगं बाई अरेच्चा’मधील सोनाली बेंद्रेच्या ‘छम छम करता है’च्या आयटम साँगने रसिकांना घायाळ केले असले, तरी अमोल पालेकरांच्या ‘अनाहृत’मधील तिच्या अभिनयाला जास्त पसंती दिली गेली. ईशा कोप्पीकर आणि ऋषिता भट यांनी ‘मात’ आणि ‘मणिमंगळसूत्र’मधून मराठीत पदार्पण केले. या अभिनेत्रींच्या यादीत ग्रेसी सिंग, तनिषा मुखर्जी, सागरिका घाटगे, टिस्का चोप्रा, हुमा कुरेशी, पल्लवी जोशी, रेणुका शहाणे अशा अनेक अभिनेत्रींची नावे घेता येतील. यातल्या काही अभिनेत्रींनी मराठीमध्ये नृत्याच्या सादरीकरणापुरते समाधान मानले, ज्यात पद्मा खन्नापासून ते गुरलीन चोप्रा आणि श्वेता तिवारी यांची नावे घेता येतील. एकूणच बॉलिवूड अभिनेत्रींना मराठीचे नेहमीच आकर्षण वाटले आहे असे दिसते. - ल्लें१ं३ं.स्रँंल्ल्रि२@’ङ्म‘ें३.ूङ्मे

‘परिणिता’, ‘भूलभुलय्या’, ‘डर्टी पिक्चर’, ‘ कहानी’, ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयात वेगळे स्थान मिळविलेली प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे ‘विद्या बालन’. भगवानदादांच्या जीवनावरील ‘अलबेला’ चित्रपटातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. तिच्या या मराठीतील प्रवेशामुळे अनेकांना सुखद धक्का बसला.

मराठीत अधिक स्वातंत्र्य
बॉलिवूडमधील तगड्या अनुभवानंतर मराठीमध्ये काम करताना काय जाणवले, याविषयी सांगताना ती म्हणते, ‘‘मी एकाच मराठी चित्रपटात काम केले असले तरी मी हे आवर्जून नमूद करू इच्छिते, की इथे कोणतेही रेडिमेड मटेरियल नाहीये. सतत नवीन प्रयोग केले जातात. ज्याप्रमाणे रंगभूमीवर प्रत्येकाला स्वत:ला सिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आणि संधी मिळते, तसेच ते चित्रपटातही मिळते. - टिस्का चोप्रा, अभिनेत्री

Web Title: Marathi actresses are also attracted to Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.