मराठी कलाकार सोशल मीडियावरदेखील हिट
By Admin | Published: September 2, 2016 03:26 AM2016-09-02T03:26:36+5:302016-09-02T03:26:36+5:30
दोन वर्षांपूर्वी टिष्ट्वटर अकाउंट व्हेरीफाय झालेला स्वप्निल जोशी हा एकमेव मराठी अभिनेता होता. मात्र आता, सोशल मीडिया वापरण्याचा ट्रेंड मराठी कलाकारांमध्ये चांगला रुजला आहे.
दोन वर्षांपूर्वी टिष्ट्वटर अकाउंट व्हेरीफाय झालेला स्वप्निल जोशी हा एकमेव मराठी अभिनेता होता. मात्र आता, सोशल मीडिया वापरण्याचा ट्रेंड मराठी कलाकारांमध्ये चांगला रुजला आहे. कारण स्वप्निलपाठोपाठ आता अनेक मराठी कलाकारांचे टिष्ट्वटर अकाउंट व्हेरीफाय होत असल्याचे दिसत आहे. अशाच काही मराठी कलाकारांचा घेतलेला हा आढावा...
सई ताम्हणकर प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचेदेखील ट्विटर अकाउंट काही महिन्यांपूर्वीच व्हेरीफाय करण्यात आले आहे. सईचे आतापर्यंत ४९.३ के फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरदेखील सईने आपला जलवा कायमस्वरूपी ठेवला आहे.
स्वप्निल जोशी मराठी इंडस्ट्रीमध्ये ट्विटर अकाउंट व्हेरीफाय होणारा स्वप्निल जोशी हा पहिला अभिनेता आहे. त्यामुळे साहजिकच चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरदेखील स्वप्निल हा हीरो बनला आहे. त्याचे आतापर्यंत ३६.८ के फॉलोअर्स असल्याचे दिसत आहे.
रवी जाधव
मराठी इंडस्ट्रीला सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक रवी जाधव हे ट्विटरवरदेखील चित्रपटाप्रमाणेच हिट झालेले दिसत आहेत. कारण त्यांना प्रेक्षकांनी ट्विटरवरदेखील भरभरून प्रेम दिले आहे. ट्विटरवर त्यांचे ६७.७ के फॉलोअर्स असल्याचे पाहायला मिळत आहेत. एवढे फॉलोअर्स असणारे ते मराठी इंडस्ट्रीतील पहिलेच दिग्दर्शक आहेत.
संजय जाधव
दिग्दर्शक संजय जाधव यांचे ट्विटर अकाउंट नुकतेच व्हेरीफाय करण्यात आले आहे. प्रेक्षकांचा हा लाडका दिग्दर्शक ट्विटरवरदेखील आपली दुनियादारी करण्यात यशस्वी झाला आहे. संजय याचे ट्विटरवर दोन हजार चारशे फॉलोअर्स असल्याचे पाहायला मिळत आहे.
स्पृहा जोशी
आपल्या अभिनय व कवितेने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील ट्विटरवर हिट असल्याचे दिसत आहे. स्पृहाचे २९.८ के फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरील तिच्या कवितादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
सिद्धार्थ जाधव
सिद्धार्थच्या ‘गेला उडत’ या नाटकाचे प्रमोशन सोशल मीडियावर झक्कास पद्धतीने चालू असल्याचे दिसत आहे. त्याच्या ‘एकापेक्षा एक’ नाटकाच्या प्रमोशन पद्धतीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावर कायम अॅक्टिव राहणाऱ्या सिद्धार्थचे २४.३ के फॉलोअर्स आहेत.
ऊर्मिला कोठारे
अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हिचेदेखील नुकतेच ट्विटर अकाउंट व्हेरीफाय झाले आहे. या मँगो डॉलीचेदेखील
आतापर्यंत २४.८ के फॉलोअर्स असल्याचे दिसत आहे.
मराठी इंडस्ट्रीतील या कलाकारांचे व्हेरीफाय झालेले अकाउंट ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पण या इंडस्ट्रीतील असेही कलाकार आहेत, की ते वास्तविक जीवनात लोकप्रिय आहेत, मात्र सोशल मीडियावर मागे पडले आहेत. यामध्ये प्रिया बापट, अमृता खानविलकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, उमेश कामत, अंकुश चौधरी यांचा समावेश आहे.