"हातावर १५० टाके अन्...", आयुष्यातील 'रानटी'पणावर शरद केळकरने केलं उघडपणे भाष्य; म्हणतो- "मुलगी आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:40 AM2024-11-22T11:40:57+5:302024-11-22T11:45:51+5:30
समित कक्कड दिग्दर्शित बहुचर्चित 'रानटी' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Sharad kelkar: आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीत आता नजर खिळवून ठेवणारा 'रानटी' हा अॅक्शनपट आला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटात विष्णूची आणि त्याच्या जिगरबाज अंदाजाची कथा पाहायला मिळणार आहे. शिवाय विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं या चित्रपटातील सूडनाट्य पाहणं रंजक आहे. 'रानटी' चित्रपटात शरद केळकरसह (Sharad Kelkar) संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, छाया कदम, जयवंत वाडकर, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, शान्वी श्रीवास्तव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता शरद केळकरने त्याला आयुष्यात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं आहे.
नुकतीच 'रानटी' चित्रपटाच्या टीमने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद केळकरला प्रत्यक्ष आयुष्यात कधी 'रानटी'पणा अनुभवला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "माझ्या हातावर १५० टाके आहेत. असं नाही मी रानटीपणा कधी केला नाही. मला दोन लोक आवडत नाहीत. एकतर जे खोटं बोलतात दुसरं म्हणजे जे मला खोटारडं म्हणतात. त्यामुळे तेव्हा छोटी गोष्ट असेल तरी माझा रानटीपणा बाहेर येतो. पण आता गेल्या १० वर्षांपासून रानटीपणा कमी आहे."
पुढे अभिनेता म्हणाला, "मुलगी आयुष्यात येते तेव्हा राग आणि रानटीपणा बाजूला जातो. आजूबाजूला सगळं शांत वातावरण असतं. तुम्ही शांत असता, आपल्या घराबद्दल आणि मुलीबद्दल विचार करता. त्यामुळे आधी रानटी होतो पण आता शांत झालोय." असा खुलासा अभिनेत्याने केला."