"कधीकाळी अक्षरशः शिव्या, मारामारी करणारे...", छाया कदम यांची भावासाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 03:53 PM2024-11-05T15:53:57+5:302024-11-05T15:58:13+5:30
अभिनेत्री छाया कदम यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही.
Chhaya Kadam: छाया कदम (Chhaya Kadam) यांना आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. 'सैराट', 'झुंड', 'न्यूड' ते 'लापता लेडीज','मडगांव एक्सप्रेस' यांसारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. नुकतीच छाया कदम यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहलंय,"दिवाळी झाली. त्या सोबत येणारी भाऊबीज ही सरली. पण आपल्या पासून लांब असलेला आपला भाऊ आपल्याला आठवत जाताना, त्याच्या आणि माझ्या आतापर्यंतच्या सोबतीत त्याने माझ्या सोबत, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर केलेली भांडणे असो की मी त्याच्या सोबत धरलेला निगरगट्ट अबोला असो. दरवेळी दोघांच्या अगदी टोकाच्या भूमिका. पण जसे जसे वय वाढत गेले तस तसे कदाचित मला त्याच्या डोळ्यात आई दिसायला लागली, आणि त्याला माझ्या डोळ्यात आमचे बाबा. परिस्थिती - वेळ सगळं निभावून घेऊन जात असताना, कधीकाळी अक्षरशः शिव्या आणि मारामारी करणारे आम्ही दोघे, कधी एकमेकांसाठी ढाल बनून एकमेकांना जपू लागलो कळलेच नाही. एकेकाळी एकमेकांशी काहीच संबंध ठेवायचे नाही, या अहंकारी विचारात अडकलेलो आम्ही दोघे, आज एकमेकांसाठी एकमेकांची ताकद होऊन उभे आहोत".
पुढे त्यांनी लिहलंय, "बाकी काही असो संतोष! भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो, आपण कोणत्या धाग्यात आणि ओवळणीत अडकलो नाही. पण तरीही आपले जगणे एकमेकांसाठी विश्वास आणि आधाराचे होत गेले. आणि आपले हे नाते घट्ट होण्याचे एकमेव कारण म्हणजे माझी लाडाची वहिनी, साक्षी. खूप खूप प्रेम तुला संतोष. वहिनीला घट्ट घट्ट मिठी. आणि आर्यन - अथर्व तुमका आत्ते कडसून गोड गोड पप्पी".