१४०० कोटींचा 'फिल्मी' धमाका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:40 PM2023-08-20T13:40:06+5:302023-08-20T13:41:25+5:30
Cinema: मागील महिन्याभरात भारतीय बॅाक्स ऑफिसवर १४०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे.
संजय घावरे
२१ जुलै रोजी 'ओपनहायमर' आणि 'बार्बी' या एकाच दिवशी भारतात रिलीज झालेल्या हॅालिवूडपटांनी भारतीय बॅाक्स ऑफिस गाजवले. त्यानंतर 'मिशन इम्पॅासिबल' या हॅालिवूडपटासोबत हिंदी 'रॅाकी और रानी की प्रेमकहानी' आणि मराठी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटांनीही तूफानी बिझनेस केला. 'गदर २', 'ओएमजी २' आणि 'जेलर' यांच्या धडाकेबाज व्यवसायाच्या बळावर मागील महिन्याभरात भारतीय बॅाक्स ऑफिसवर १४०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे.
'ओपनहायमर' आणि 'बार्बी' या हॅालिवूडपटांनी दमदार बिझनेस करत जणू भारतीय सिनेमांसाठी वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. त्यानंतर आलेल्या टॅाम क्रूझच्या 'मिशन इम्पॅासिबल ७'ची क्रेझ होतीच. 'रॅाकी और रानी की प्रेमकहानी'मधील रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली. चांगले आणि काहीतरी वेगळे दिले तर प्रेक्षक चित्रपट पाहायला येतात हे 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने दाखवून दिले. स्वातंत्र्यदिनाच्या गोल्डन विकमध्ये 'गदर २' आणि 'ओ माय गॅाड २' असे दोन सिक्वेल रिलीज झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'गदर २'ने प्रेक्षकांचा कौल मिळवत ३०५.१३ कोटी रुपयांची कमाई केली, तर 'ओएमजी २' हा चित्रपटही ९१.०८ कोटी रुपये कमवत १०० कोटींच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीच्या आहारी गेलेले प्रेक्षक पुन्हा सिनेमागृहांमध्ये येतील का? या प्रश्नाचे उत्तर गोल्डन विकने दिले आहे. मागच्या आठवड्यात शनिवार-रविवार या विकेंडच्या सुट्ट्यांना जोडून दोन सार्वजनिक सुट्ट्या आल्याचा फायदा 'गदर २' आणि 'ओएमजी २' यांना झाला. 'गदर २'ने अक्षरश: बॅाक्स ऑफिसला हलवून टाकले. 'ओएमजी २'लाही उत्तम प्रतिसाद मिळाला, दोन्ही चित्रपटांचे विषय भिन्य असल्याने त्यांना एकाच पारड्यात तोलणे चुकीचे आहे. 'गदर २' सुपर ब्लॅाकबस्टर आहे, तर 'ओएमजी २'नेही चांगला व्यवसाय केला आहे. दक्षिणेकडे रजनीकांतचा 'जेलर' ब्लॅाकबस्टर ठरल्याने एकाच आठवड्यात तीन मोठे चित्रपट रिलीज होणे आणि प्रेक्षकांकडून तीनही स्वीकारले जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा काळ चित्रपटांसाठी खूप चांगला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी चित्रपट हाऊसफुल झाल्याने स्क्रीन्सची कमतरता भासू लागणं हा भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगला संकेत आहे. काँटेंट चांगला असेल तर प्रेक्षक चित्रपट डोक्यावर घेतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुढील आठवड्यात 'सुभेदार' आणि 'बाप ल्योक' हे दोन मोठे मराठी चित्रपट रिलीज होणार असून, दोघांमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महिना गाजवलेले सिनेमे...
१०९.७५ कोटी - ओपनहायमर
४०.०१ कोटी - बार्बी
७२.८५ कोटी - मिशन इम्पॅासिबल
२९५.०२ कोटी - रॅाकी और रानी की प्रेमकहानी
७६.०५ कोटी - बाईपण भारी देवा
३०५.१३ कोटी - गदर २
९१.०८ कोटी - ओ माय गॅाड २
४०७.१७ कोटी - जेलर
आता अॅव्हरेज नाही चालणार...
पूर्वी अॅव्हरेज काँटेंटही चालायचे, पण आता तसे चालणार नाही. आता लोकांच्या आवडी-निवडीचा ग्राफ उंचावला आहे. त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. त्यामुळे अॅव्हरेजपेक्षा चांगले असेल तर आम्ही सिनेमागृहात येऊ. अॅव्हरेज काँटेंट आम्ही घरबलस्या बसू असा स्पष्ट मेसेज प्रेक्षकांनी फिल्ममेकर्सना दिला आहे. हा आगामी सिनेमांच्या दृष्टीने शुकशकून आहे.
- कोमल नाहटा (फिल्म ट्रेड अॅनालिस्ट)
चित्रपट खूप चांगला व्यवसाय करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच वर्षांनी इतका मोठा चांगला काळ आल्याने या आठवड्याला गोल्डन विक म्हटले जात आहे. अगोदरही चित्रपट चालायचे, पण एखादा चालला तर नंतर चार-पाच मोठे चित्रपट फ्लॅाप व्हायचे. या आठवड्यात खूप चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळाल्याने हा गोल्डन विक बनला आहे. कारण अशा प्रकारचे आऊटस्टँडींग कलेक्शन कोणत्याही आठवड्यात पाहायला मिळाले नाही.
- शौकत पठाण (वितरक)
'वेड' आणि 'पठाण'नंतर फेब्रुवारी ते जूनपर्यंत सिनेमांची परिस्थिती वाईट होती. सिनेमाची लाईन संपली असं वाटलं, पण 'बाईपण भारी देवा'ने जादू केली. 'माहेरची साडी'सारखा फिल असल्याने महिलांनी खूप गर्दी केली. महिला सिनेमासाठी गर्दी करतात तेव्हा चित्रपट तूफान चालतो. छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंत गर्दी खेचली. वाईट स्थितीतील सिनेमागृहांमध्येही हाऊसफुल झाला. २० वर्षे जुना हिरो असूनही 'गदर २'ने कहर केला आणि काँटेंट हिरो बनला आहे. 'ओएमजी २' आणि 'जेलर'लाही चांगला प्रतिसाद आहे.