मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 11:09 AM2022-06-23T11:09:36+5:302022-06-23T11:11:24+5:30

Historical films: लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

23 historical films to be screened on Marathi cinema | मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट!

मराठी सिनेपटलावर झळकणार २३ ऐतिहासिक चित्रपट!

googlenewsNext

संजय घावरे

मुंबई : 'पावनखिंड', 'शेर शिवराज' आणि 'सरसेनापती हंबीरराव' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर भविष्यात आणखी काही शिवकालीन चित्रपट रसिकांना पहायला मिळणार आहेत. मराठी सिनेपटलावर तब्बल २३ शिवकालीन चित्रपट झळकणार आहेत. यापैकी काही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, काही निर्मितीप्रक्रियेत आहेत, तर काही घोषणेपलिकडे जाऊ शकलेले नाहीत.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. सध्या दिग्पाल आणि त्याची टिम शिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटाची जोरदार तयारी करत असून, लवकरच या चित्रपटाच्या शीर्षकाचीही घोषणा करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसोबत शंभूराजांच्या व्यक्तिरेखेतही आपला ठसा उमटवणाऱ्या खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी 'शिवप्रताप'च्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाचा जागर करण्याचा निश्चय केला आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी झालेल्या कोल्हेंनी 'शिवप्रताप - वाघनखं', 'शिवप्रताप - वचपा' आणि 'शिवप्रताप - गरुडझेप' या तीन चित्रपटांची घोषणा फार पूर्वीच केली आहे. त्यापैकी 'शिवप्रताप - वाघनखं'ला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. 'बाल शिवाजी' या शीर्षकाने दोन चित्रपट बनणार आहेत. यापैकी एकाचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहे, तर रितेश देशमुखनेही दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या साथीने 'बाल शिवाजी'ची घोषणा केली आहे. याशिवाय नागराज आणि रितेश यांनी 'राजा शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी' या चित्रपटांचीही योजना आखली आहे. या चित्रपटांना अजय-अतुल संगीत देणार आहेत.

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि अभूतपूर्व पराक्रम केला होता. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे 'काळभैरव' म्हणून ओळखले जाणारे मुरारबाजी यांची यशोगाथा १७ फेब्रुवारी २०२३ रोजी येणार आहे. लेखक-दिग्दर्शक अभिजीत शिरीष देशपांडे यांचा बहुचर्चित 'पावनखिंड'नं आता 'हर हर महादेव'चे रूप धारण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहीलेली एक अजरामर शौर्यगाथा... या टॅगलार्इनसह मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'हर हर महादेव' ही बुलंद शिवगर्जना पाच भारतीय भाषांमध्ये येत्या दिवाळीत पहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.  

राहुल जाधव दिग्दर्शित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा चित्रपट शिवकालीन रणरागिणीची कथा सांगणार आहे. यात सोनाली कुलकर्णी टायटल रोलमध्ये दिसेल. अनुप जगदाळेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'राव रंभा' या चित्रपटात शिवरायांच्या एका सरदाराची प्रेमकथा पहायला मिळेल. ओम भूतकर आणि मोनालीसा बागल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दिवाळीनंतर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय दिग्दर्शक मिथिलेश सूर्यवंशी यांनी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर 'सतराशे एक पन्हाळा' या चित्रपटाचा मुहूर्त केला आहे. यात सुशांत शेलारसह बरेच मराठी कलाकार आहेत. नुकतीच लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. 'शाहू छत्रपती' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित असून या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज करणार आहेत.

'वीर दौडले सात' आणि 'सरनोबत'

१६७३मधील कहाणी महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी 'वीर दौडले सात' आणि हिंदी 'वो सात' या चित्रपटांमध्ये पहायला मिळेल. आदिलशहाच्या हुकूमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या बहलोल खानाला सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी कडवी झुंज दिली. त्या सात जणांची कथा या चित्रपटांमध्ये आहे. पुढल्या दिवाळीला रिलिज होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले असून, हितेश मोडक संगीत देणार आहेत.

मांजरेकरांच्या या चित्रपटाखेरीज प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा लढवय्या मावळ्यांची कथा सांगणारा आणखी एक चित्रपट बनणार आहे. मराठमोळा दिग्दर्शक दीपक कदमने थेट हिंदीत झेप घेत 'सरनोबत' हा सिनेमा हिंदीसह दक्षिणात्य भाषांमध्येही बनवण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टसोबतच अद्याप बऱ्याच गोष्टी फायनल व्हायच्या बाकी असून, सध्या जमवाजमव सुरू असल्याचे दीपकने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

हे सिनेमे घोषित झाले पण...

राजमाता जिजाऊ मांसाहेबांची कहाणी सांगणाऱ्या 'जिऊ - स्वराज्य कनिका' या चित्रपटाचे पहिले पोस्टर दोन वर्षांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन प्रितम पाटील करणार आहेत. याखेरीज दोन वर्षांपूर्वीच 'बहिर्जी' या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुप्तहेर अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाईकांच्या पराक्रमाची गाथा यात असेल. मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांच्यावर आधारलेल्या 'भद्रकाली' चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन करत आहेत. याचे लेखन दिग्पाल लांजेकरने केले असून, दिग्दर्शन प्रसाद ओक करत आहे. या चित्रपटाला अजय-अतुलचे संगीत लाभणार आहे. लेखक-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी प्रवीण तरडेसोबत मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचीही घोषणा केली आहे, पण पुढील काम संथ गतीने सुरू आहे.

Web Title: 23 historical films to be screened on Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.